चंद्रकांतदादांची मागणी अजितदादांकडून मान्य; आमदार निधीबाबत महत्वाचा निर्णय - Dy CM Ajit Pawar takes decision about MLA devlopment fund for corona | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांतदादांची मागणी अजितदादांकडून मान्य; आमदार निधीबाबत महत्वाचा निर्णय

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

अजित पवार यांनी आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात बैठक घेतली.

पुणे : राज्यातील कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. त्यामुळे आमदार निधीतील प्रत्येकी एक कोटी रुपये सार्वजनिक रुग्यालयांना मदत म्हणून मंजूर करावेत व प्राधान्याने प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभारावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली व ती उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली.

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी पाटील यांनी आज पवार यांची पुण्यात भेट घेतली. राज्य सरकारने आमदारांना विकासनिधी वाढवून दिला आहे. त्यापैकी काही निधी थेट कोरोनाच्या प्रतिबंधासाठी वापरणे व त्या माध्यमातून सार्वजनिक रुग्णालयांना मदत करण्याची गरज आहे. आमदार निधीतील दोन कोटी रुपये कोरोना प्रतिबंधासाठी उपलब्ध करावेत, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यापैकी एक कोटी रुपये निधीला पवार यांनी तातडीने मान्यता दिली. तर उर्वरित एक कोटी रुपयांबाबत आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे पवारांनी सांगितले. 

अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलतानाही याबाबत माहिती दिली. विधासनभेतील 288 आमदार व विधान परिषदेतील आमदारांना प्रत्येकी एक कोटी रुपये आपल्या मतदारसंघात कोरोनावरील उपाययोजनांसाठी खर्च करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनासाठी जवळपास 350 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

दरम्यान, पवार यांच्याशी चर्चा करताना पाटील यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असल्याने सर्वत्र समस्या निर्माण झाली आहे. हे ध्यानात घेता सर्व मोठ्या रुग्णालयांचे स्वतःचे ऑक्सिजन निर्मिती केंद्र असणे व त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्यबाबत स्वयंपूर्ण असणे गरजेचे आहे. आमदार निधीचा वापर या कामासाठी करण्यात यावा.

पाटील यांनी रेमडिसिवर इंजेक्शनच्या तुटवड्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. या इंजेक्शनची खरेदी तसेच रुग्णांना ती देणे ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे होण्याची गरज आहे. रुग्णांना उपचार मिळण्याबरोबरच विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठीही सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख