डिपॉझिट जप्त झालेल्यांना गांभीर्याने घेऊ नका! अजित पवार पडळकरांवर भडकले - Deputy CM Ajit Pawar Slams MLA Gopichand Padalkar over comment on sharad pawar | Politics Marathi News - Sarkarnama

डिपॉझिट जप्त झालेल्यांना गांभीर्याने घेऊ नका! अजित पवार पडळकरांवर भडकले

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार पडळकरांवर चांगलेच भडकले. डिपॉझिट वाचवू न शकलेल्या व्यक्तीला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची टीका पवारांनी केली.

भाजप आमदार गोपींचंद पडळकर यांनी आज पहाटे जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक हे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या होणार आहे. पडळकर यांच्या या स्टंटनंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न करताना पडळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली यावरून पोलिसांनी पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पडळकर यांनी यावेळी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोपही केले. याबाबत पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "प्रमुख पक्षाचा उमेदवार असूनही त्यांना डिपॉझिट वाचवता आले नाही. ज्यांना लोकांनी नाकारलं, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांच्याविषयी मला प्रश्वनही विचारू नका,'' अशा शब्दांत पवार यांनी पडळकरांना टोला लगावला.

गोपीचंद पडळकरांचा स्टंट

आज पहाटे पडळकर काही कार्यकर्त्यांसमवेत जेजुरी गडावर पोहोचले. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी पुतळ्या भोवती फुलांची सजावट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला. पडळकर यांनी यावेळी पवार यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. पोलिसांनी अनावरण करण्यापासून पडळकर यांना रोखले. त्यावेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. 

पडळकर यांनी यापूर्वीही असे स्टंट केले आहेत. पवार यांच्याबाबत यापूर्वीही त्यांनी अनुचित उद्गार काढले होते. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. पडळकर यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचे डिपाॅझिट जप्त झाले होते. पडळकर यांनी आमदार झाल्यापासून राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर टीका करण्याचे सत्र आरंभले.

गेल्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधान परिषद निवडणूक जाहीर झाली. भाजपने आश्चर्यकारकरित्या गोपीचंद पडळकरांना उमेदवारी दिली. या उमेदवारीमुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात वादंग माजले. पडळकरांचे बारामतीत डिपॉझिट होवूनही त्यांना आमदार केले गेल्याचा मुद्दा विशेष चर्चिला गेला. ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर असताना पडळकरांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींवर टीका केली होती.

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख