महाराष्ट्रात वातावरण बदलेल, त्याची सुरवात सोलापुरपासून - Congress had future. time will change soon. Congress Politics | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्रात वातावरण बदलेल, त्याची सुरवात सोलापुरपासून

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 जानेवारी 2021

कॅांग्रेस पक्ष पराभवाला कधीच घाबरत नाही. कॅांग्रेसने तीन पराभव पाहिले आहेत. हा पक्ष संपला असे बोलले जात असतांना कॅांग्रेसने लोकांमध्ये जाऊन काम केले अन् पुन्हा इंदिरा गांधींना जनतेने कौल दिला.

मुंबई : कॅांग्रेस पक्ष पराभवाला कधीच घाबरत नाही. कॅांग्रेसने तीन पराभव पाहिले आहेत. हा पक्ष संपला असे बोलले जात असतांना कॅांग्रेसने लोकांमध्ये जाऊन काम केले अन् पुन्हा इंदिरा गांधींना जनतेने कौल दिला. महाराष्ट्रातही वातावरण बदलणार आहे. त्याची सुरवात सोलापूर जिल्ह्यापासून होईल असे प्रतिपादन कॅांग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी केले. 

डॅा. धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज आपल्या समर्थकांसह मुंबईत टिळक भवन कार्यालयात कॅांग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी साडे सहाशे कार्यकर्त्यांनी कॅांग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेश अध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, हुसेन दलवाई, आमदार धीरज देशमुख, सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील यांसह मोठ्या संख्येने विविध नेते उपस्थित होते. 

यावेळी श्री. शिंदे म्हणाले, मोहिते पाटील घराण्याचा मोठा राजकीय इतिहास आहे. त्यांच्यामुळे शिंदेंना देखील आमदार होता आले. आज आनंदाची गोष्ट म्हणजे या घराण्यातील धवलसिंह या तरुण नेत्याने चांगला निर्णय घेत कॅांग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्याकडे धाडस आहे. राजकीय, सामाजिक दृष्टी आहे. मुख्य म्हणजे स्ट्रॅटेजी ठरवून ते काम करतात. नेतृत्व, कर्तुत्व आणि दुरदृष्टी असलेले धवलसिंह यांनी कॅांग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा जो निर्णय घेतला तो दुरदृष्टीचाच आहे. 

श्री. शिंदे म्हणाले, आज राजकारणात अनेक स्थित्यंतरे घडताना दिसतात. देशात बदल घडतो आहे. लोक इकडे तिकडे पळ सुटले आहेत. मात्र हा पक्ष कधी अशा पराभवांना घाबरत नाही. एक काळ असा होता की, कॅांग्रेसने पराभवाचा सामना केला. त्यानंतर मात्र जनतेने आधी रोटी खायेंगे, इंदिराजी को लायेंगे अशा घोषणा देत कॅांग्रेसला बहुमत दिले. वाईट दिवस येतात. पक्षालाही येतात. मात्र जनतेत जाऊन काम करावे लागेल. कॅांग्रेस पक्ष प्रभावीपणे पुढे येईल. त्यात युवकांचा मोठा वाटा असेल. सोलापूर जिल्हा व त्यातील कार्यकर्ते, जनतेला कसे जोडता येईल हे काम धवलसिंह यांनी उद्यापासूनच सुरु करावे. जिल्ह्यात उत्साह निर्माण होईल तसा महाराष्ट्रातही होईल.
....  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख