कोरोनायोद्‌ध्यांच्या पाठीवर मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप 

त्याचमुळे औषध नसतानाही आपण कोरोना नियंत्रणात आणला.
Chief Minister Uddhav Thackeray lauded the work of Corona Warriors
Chief Minister Uddhav Thackeray lauded the work of Corona Warriors

मुंबई : "कोरोनाच्या कठीण काळात अनुभवसिद्ध डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी डगमगले नाहीत, प्रशासनाने चांगली साथ दिली, हीच महाराष्ट्राची ताकद आहे. मी फक्त प्रत्येकाच्या जिद्दीवर, आत्मविश्वासावर फक्त फुंकर घालून तो जागवण्याचा प्रयत्न केला. त्याचमुळे औषध नसतानाही आपण कोरोना नियंत्रणात आणला,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळ सन्मान सोहळ्यात कोरोना योद्‌ध्यांचे कौतुक केले. 

कोरोनावर मात करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कोरोना योद्‌ध्यांना गौरविणारा सकाळ सन्मान 2021 हा कार्यक्रम आज (ता. 30 जानेवारी) प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात झाला. कोरोनाला पराभूत करण्यात वाटा उचलणारे शवागृहातील कर्मचारी कमलेश सोळंकीपासून महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे अशा लहानथोर कोरोनायोद्‌ध्यांचा सत्कार झाल्याने सर्वचजण भारावून गेले. विशेषतः "सकाळ'ने सामाजिक बांधिलकीचा जाण ठेऊन हा कौतुकसोहळा आयोजित केल्याने सर्वच पुरस्कार विजेते हरखून गेले होते. 

ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नाट्य, अभिनय, समाजसेवा क्षेत्रातील मान्यवर आदींच्या उपस्थितीने हा सोहळा अत्यंत रंगतदार झाला. 

वर्तमानपत्र वाचकांसाठीच 

"सकाळ'चे संस्थापक ना. भि. परुळेकर यांचा या सोहळ्यात ठाकरे यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. पहिल्या पानावर लहान मथळ्यात जास्तीत जास्त बातम्या सकाळ का देतो, याचे कारण सांगताना वर्तमानपत्रांतील सर्व जागेवर वाचकांचा हक्क असतो, असे उत्तर परुळेकर यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दिल्याची आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली. असे व्रत घेतलेल्या महर्षीचा वारसा सकाळ आजही पुढे नेत आहे. बातम्या, लेख देताना त्याबरोबरच सामाजिक परिस्थितीचे भान ठेवणे महत्वाचे असते, ते जपण्याची बांधिलकी "सकाळ'ने या कार्यक्रमातही दाखवली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी "सकाळ'चे कौतुक केले. 

औषध नसतानाही आपण कोरोनावर मात केली ही मोठी कामगिरी आहे. कोरोनावर मात करणाऱ्या कोविड योद्‌ध्यांबद्दलचे ऋण व्यक्त करण्यासाठी मी येथे आलो आहे. कोरोनाच्या कठीण काळात तोलामोलाची माणसं भेटली, अनुभवसिद्ध डॉक्‍टर आजारी पडूनही घाबरले नाहीत. ही महाराष्ट्राची ताकद, लोकांची जिद्द यावर फक्त फुंकर घालून त्यांचा आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न मी केला.

ते दिवस आठवून खरेतर अंगावर काटा येतो. दिवसरात्र मेहनत घेऊनही आपण पुरे पडू का ते कळत नव्हतं. सरकार कमी पडतंय हे सांगणे ठीक होते, मात्र तेव्हाच्या आमच्या अडचणी सांगितल्या असत्या तर सर्वजण घाबरले असते. तेव्हा "सकाळ'सह सर्वच प्रसारमाध्यमांनी आणि सर्वांनीच सामाजिक जाणीव ठेऊन मोलाची कामगिरी केली, आता संकट टळले असले तरी अजूनही इंग्लंडमधील विषाणूचा मानवजातीला मोठा धोका आहेच. त्यामुळे असे दिवस पुन्हा येऊ नयेत, यासाठी लस घेतल्यानंतरही कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन होईपर्यंत जास्तीत जास्त काळजी घ्यावी, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. 

अडकवले की लटकवले 

आपल्याला कोणताही अनुभव नसताना मुख्यमंत्रिपद देऊन शरद पवार यांनी आपल्याला अडकवले की लटकवले हे कळत नाही. हे म्हणजे शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्याला एकदम मुख्याध्यापक केल्यासारखाच प्रकार आहे, असे ठाकरे यांनी सांगताच सभागृहात एकच हास्यस्फोट झाला. 

आपत्तीकाळात यंत्रणा लोकांच्या पाठीशी : शरद पवार 

महाराष्ट्राची प्रशासन यंत्रणा देशात वेगळीच आहे, ही अर्धशासकीय यंत्रणेची संकल्पना आपण पहिल्यापासून जोपासली आहे. त्यामुळे अपत्तीच्या काळातही प्रशासनातील कनिष्ठ कर्मचारी ते मुख्य सचिवांपर्यंत सर्वजण संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहिले. संकट काळात समाजाला मदत करणारे योद्धे नव्या पिढीला प्रोत्साहन देतात. या सत्कारासाठी खूप लोक पात्र आहेत, मात्र सर्वांचीच निवड करता येणार नाही. कोरोना काळात सरकारच्या प्रतिनिधींनी चांगली कामगिरी केली. सत्कारमूर्तींसह मंत्र्यांनी अखंड काम केले, मालेगावच्या अधिकारी आरती सिंह यांसारखी शेकडो उदाहरणे आहेत. त्यांच्यामुळेच आपण हळुहळू कोरोना संकटातून बाहेर पडतो आहोत. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच महाराष्ट्राची स्थिती सुधारली, हे प्रयत्न करणारे सर्वच जण कोरोना योद्धे आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सर्वांचे कौतुक केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com