राम मंदिरासाठी पंकजांचे पाच लाख, फडणवीसांचे एक लाख तर चंद्रकांतदादांचे किती? - BJP state president Chandrakant Patil participate in Nidhi samarpan abhiyan for Ram Mandir | Politics Marathi News - Sarkarnama

राम मंदिरासाठी पंकजांचे पाच लाख, फडणवीसांचे एक लाख तर चंद्रकांतदादांचे किती?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पाच लाख तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक लाखाचा निधी दिला आहे.

पुणे : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पाच लाख तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक लाखाचा निधी दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आज निधी दिला. मात्र, निधीची रक्कम त्यांनी जाहीर केलेली नाही.

राम मंदीर उभारण्यासाठी देशभर निधी संकलन मोहिम राबविण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून या अभियानाचा प्रारंभ 15 जानेवारी रोजी करण्यात आला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन निधी संकलनाचे अभियान सुरू आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत हे देशव्यापी अभियान सुरू राहणार आहे. 12 कोटी कुटुंबांशी संपर्काचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

यांतर्गत काही दिवसापूर्वी माजलगाव येथे एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी या निधीचा धनादेश संकलकांकडे सुपूर्द केला. तर देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी महाराज यांच्याकडे निधीचा धनादेश दिला.  

चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी समर्पण निधीचा धनादेश पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी भागाचे संघचालक दिगंबरजी परुळेकर, संभाजीनगर कार्यवाह सुधीरजी जवळेकर, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, सुधीरजी पाचपोर आदी उपस्थित होते.

समर्पणानंतर पाटील म्हणाले की, "प्रभू श्रीराम आमचे श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीत भव्य मंदिर उभारणे हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी समर्पण म्हणजे आमची श्रद्धा आहे." दरम्यान, पंकजा मुंडे व देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिरासाठी दिलेल्या निधीची रक्कम जाहीर केली आहे. मात्र, पाटील यांनी ही रक्कम जाहीर केलेली नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख