चित्रा वाघांच्या मागे गाड्या काय लावता? त्या गाड्या कुठे घेऊन जाईन, हे तुम्हालाही समजू देणार नाही  - BJP MLA Nitesh Rane criticizes Shiv Sena leaders | Politics Marathi News - Sarkarnama

चित्रा वाघांच्या मागे गाड्या काय लावता? त्या गाड्या कुठे घेऊन जाईन, हे तुम्हालाही समजू देणार नाही 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 9 मार्च 2021

तुम्ही बिनधास्त आवाज उठवा. मी आणि संपूर्ण भाजप पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत

पुणे : "पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण उचलून धरणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना धमक्‍या दिल्या जातात. त्यांच्या मागे गाड्या फिरवता. शिवसेना नेत्यांवर मी दररोज टीका करतो, धमक असेल तर माझ्यावर कारवाई करा. कशाला उगाच चित्रा वाघ यांच्या मागे गाड्या फिरविता. यापुढे त्यांच्या मागे फिरणाऱ्या गाड्यांना मी कुठे घेऊन जाईन, ते तुम्हाला कुणाला समजूही देणार नाही,'' असा इशारा भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी शिवसेनेला दिला. 

भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी निवड, नियुक्ती व निवडपत्र देण्याचा कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील हवेली तालुकाध्यक्ष संदीप सातव यांच्या पुढाकाराने नुकताच वाघोली (ता. हवेली) येथे पार पडला. त्या कार्यक्रमात राणे बोलत होते. या वेळी माजी आमदार बाबूराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे शहर भाजपच्या उपाध्यक्षा स्वरदा बापट, पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जालिंदर कामठे, किरण दगडे, दादा सातव, सुदर्शन चौधरी, रोहिदास उंद्रे, प्रवीण काळभोर, संजय पाचंगे, भगवानराव शेळके, जयेश शिंदे, रोहीत खैरे, गणेश कुटे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

नीतेश राणे म्हणाले, "शिवसेनेची स्टाईलच केवळ धमकावयचे अशी आहे. त्यांनी चित्रा वाघ यांच्याबरोबरच मधल्या काळात भाजपचे मुंबई पालिका निवडणूक प्रभारी अतुल भातखळकर यांनाही धमक्‍या देण्याचे प्रकार केले. मुळात शिवसेनेसोबत आम्ही 39 वर्षे काढली आहेत. मी दररोज शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांवर टीका करतो. पण ते मला काहीच करू शकलेले नाहीत. मला ठाऊक आहे की शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काहीच करू शकत नाहीत. त्यामुळे मी तर चित्राताई वाघ यांच्या सुरक्षेसाठी आहेच. शिवाय भाजपचे पदाधिकारी म्हणून जे कुणी या पुढे पदे ग्रहण करीत आहेत, त्यांना एकच सांगतो, समाजात कुणावरही अन्याय होवू द्या. तुम्ही बिनधास्त आवाज उठवा. मी आणि संपूर्ण भाजप पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख