ईडीविरोधात अविनाश भोसले उच्च न्यायालयात  - Avinash Bhosale in the High Court against ED | Politics Marathi News - Sarkarnama

ईडीविरोधात अविनाश भोसले उच्च न्यायालयात 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी (ता. 15) सुनावणी होणार आहे. 

बांधकाम व्यावसायिक भोसले आणि त्यांचा मुलगा अमित यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) व मनी लॉण्ड्रिंगच्या आरोपात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच, त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्सही बजावण्यात आली आहे. 

गुन्हा रद्द करण्यासाठी आणि समन्सच्या विरोधात भोसले यांनी शुक्रवारी याचिका दाखल केली. याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमृर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. ईडीला याचिकेवर लेखी बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सुनावणीमध्ये न्यायालयाने भोसले यांना कोणतीही सवलत दिली नाही; मात्र याचिकेवर सोमवारी सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले आहे. पुणे, मुंबई आणि कोल्हापूरमध्ये प्रवर्तक एबीआयएल समूह लोकप्रिय आहे. बांधकाम क्षेत्रात विविध प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. ईडीने मागील काही दिवसांत त्यांच्या कार्यालयांमध्ये छापे टाकले होते.

प्रकरण काय? 

भोसले यांची ईडीने गुरुवार (ता. ११ फेब्रुवारी) रोजी तब्बल आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली. भोसले यांची MH-01 DD 0088 या क्रमांकाची बेंटले कार गुरुवारी मुंबईतील बेलार्ड पियार्डमध्ये उभी होती. चाणाक्ष बातमीदारांच्या नजरेत ही गाडी आली आणि अविनाश भोसले यांची चौकशी सुरू असल्याची बातमी व्हायरल झाली.    

निवृत्तीनाथ यात्रेत राजकीय नेत्यांना वगळल्याने वारकरी खुष !

अविनाश भोसले हे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्या शब्दाला वजन असल्याची चर्चा असते. थेट त्यांचीच चौकशी सुरू असल्याने खळबळ उडाली होती. परकीय चलनाविषयीच्या `फेमा` कायद्यांतर्गत त्यांची चौकशी झाली.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर ईडीने छापा मारल्याची घटना ताजी असतानाच भोसले  यांच्या चौकशीनेही राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. महाआघाडी सरकारमधील नेत्यांशी किंवा त्यांच्या संबंधित कुटुंबियांची तर चौकशी सुरू नाही ना, अशीही चर्चा यामुळे सुरू झाली.

पूजा चव्हाण प्रकरणातील 'ते' मंत्री गायब...पण त्यांची गाडी सापडली...
 

गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून भोसले हे ईडीच्या कार्यालयात उपस्थित होते. रात्री साडे आठच्या सुमारास ते तेथून बाहेर पडले.  भोसले यांच्यासोबत नाशिकच्या काही मंडळींची चौकशी सुरू असल्याचे समजते. मात्र त्यांची नावे समजू शकली नाही.  भोसले यांचा पुण्यात आणि मुंबईत बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. तसेच देशभर त्यांची कंपनी पायाभूत क्षेत्रात काम करते. ईडीच्या नजरेत त्यांचे कोणते व्यवहार आले, याचा खुलासा नंतरच होण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या कंपनीचे पुण्यात मुख्यालय आहे. तेथे ईडीने छापा मारला होता. 

पुण्यात कधी काळी रिक्षा चालविणारे अनिनाश भोसले हे मोठे बांधकाम व्यावसायिक झाल्याने त्यांच्याबद्दलच्या `सक्सेस स्टोरीज`ही सोशल मिडियात व्हायरल होत असतात.

Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख