थकबाकीदारांनी घेतला 'बत्ती गुल'चा धसका; 580 कोटींचे वीजबिल भरले - 580 crore electricity bill paid by arrears in western maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

थकबाकीदारांनी घेतला 'बत्ती गुल'चा धसका; 580 कोटींचे वीजबिल भरले

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

सुमारे 80 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केल्याची माहिती महावितरणने दिली.

पुणे : मागील दहा महिने वीजबिल न भरलेल्या थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. या इशाऱ्यांनंतर मागील 23 दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात तब्बल 580 कोटी रुपये वीजबिल भरण्यात आले आहे. सुमारे साडे चार लाख ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा केला आहे. तसेच थकबाकी न भरणाऱ्या सुमारे 80 हजार ग्राहकांचा वीज पुरवठाही खंडित केल्याची माहिती महावितरणने दिली.

एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या दहा महिन्यांच्या कालावधी लाखो ग्राहकांनी एकदाही वीजबिल भरलेले नाही. या कालावधीत वाढीव बिल आकारण्यात आल्याचा दावा अनेक ग्राहकांनी केला आहे. तसेत भाजपसह मनसेनेही या कालावधीतील बिल न भरण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. याबाबत राज्य सरकारलाही विरोधी पक्षांनी या काळातील बिल माफ करण्याची विनंती केली होती. पण राज्य शासनाने बिल वसुलीचा निर्णय घेतला. तसेच बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशाराही दिला आहे.

या इशाऱ्यानंतर थकबाकीदारांची बिल भरण्याची रांग लागली आहे. मागील 23 दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील 4 लाख 54 हजार थकबाकीदारांनी 579 कोटी 88 लाख रुपयांचा भरणा केला आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये 26 लाख 47 हजार वीजग्राहकांकडे एकूण 1690 कोटी 54 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी अद्यापही दहा महिन्यांत एकदाही बिल न भरलेल्या 9 लाख 32 हजार ग्राहकांकडे 687 कोटी 97 लाख रुपये थकबाकी आहे. 

महावितरणने आवाहन केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील 1 लाख 69 हजार 533 ग्राहकांनी 301 कोटी 91 लाख, सातारामधील 59 हजार 265 ग्राहकांनी 51 कोटी 52 लाख, सोलापूर येथील 85 हजार 825 ग्राहकांनी 81 कोटी 22 लाख, कोल्हापूर जिल्हातील 78 हजार 909 ग्राहकांनी 84 कोटी 96 लाख व सांगली जिल्ह्यातील 60 हजार 563 ग्राहकांनी 60 कोटी 31 लाख रुपयांची थकबाकी भरली आहे. 

पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी सांगितले की, कोरोनामुळे एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 पर्यंत थकबाकीसाठी एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला नाही. बिलांचा भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक कोंडी झाली आहे. या भागात 1 फेब्रुवारीपासून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 80 हजार 800 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच वीज बिल भरण्यासाठी वेग वाढला असल्याचे नाळे यांनी सांगितले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख