राज्यपालांना भेटण्यासाठी नेत्यांची रिघ : दुसरीकडे राजभवनवरील 15 पोलिसांना कोरोनाची लागण

पोलिसांसाठी ही आणखी चिंतेची बाब ठरणार आहे.
rajbhavan
rajbhavan

दौंड (पुणे) : मुंबई येथील राजभवन मध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची विविध लोकप्रतिनिधींनी भेट घेत चर्चा केल्यानंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले असले तरी एक चिंतेची बाब पुढे आली आहे. राजभवन येथील बंदोबस्त करून दौंड तालुक्यात परतलेल्या इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) तब्बल १५ पोलिसांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. १५ पोलिसांना बाधा झालेली असतानाही राजभवन येथे उच्चपदस्थांच्या भेटीगाठी कमी होण्याऐवजी वाढलेल्या आहेत. 

आयआरबीचे मुख्यालय कोल्हापूर येथे असून गट क्रमांक सोळा या नावाने ओळखले जाते. आयआरबीच्या काही तुकड्या पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीफ) प्रांगणात स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या मुंबई येथील राजभवन ५० एकर क्षेत्रात वसलेले असून तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. राजभवन येथील बंदोबस्त करून परतलेल्या आयआरबीच्या तुकडीला दौंड शहरात न आणता दौंड - पाटस रस्त्यावरील एका विद्यालयात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते. दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून तुकडीतील सर्वांचे घशातील द्रवाचे नमुने घेतले असता तीन पोलिसांना १६ मे रोजी आणि बारा पोलिसांना १९ व २० मे रोजी कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले.

ज्या पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नव्हती. सर्व पंधरा कोरोना बाधित पोलिसांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत. तुकडीतील उर्वरित पोलिसांचे लिंगाळी (ता. दौंड) येथे १४ दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे.                 

राजभवन येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील विविध मागण्यांसाठी राज्यपाल यांची सातत्याने भेट घेत आहेत. २० मे रोजी राज्यपाल यांनी राज्यापुढील करोना विषाणू संसर्गाच्या आव्हानाच्या अनुषंगाने राज्याच्या विविध विभागांच्या पूर्व तयारीचा एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला होता. बैठकीला मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंग चहल, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राज्यसभेचे खासदार संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, किरीट सोमैय्या, मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची गेल्या दोन दिवसांत भेट घेतली. राजभवन येथे शरद पवार यांनी राज्यपाल यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची `मातोश्री`वर भेट घेत चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांच्या `मातोश्री` निवासस्थानी बंदोबस्तावर असलेले दोन पोलिस कोरोनाबाधित आढळल्यानंतर खळबळ उडाली. राजभवनावरील तर 15 पोलिस कोरोनाग्रस्त ठरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com