सुबोध जयस्वाल, रश्मी शुक्लानंतर आता परमबीरसिंहही प्रतिनियुक्तीवर केंद्रात जाणार का?
Subodh Jaiswal, Parambir Singh, Rashmi Shukla .jpg

सुबोध जयस्वाल, रश्मी शुक्लानंतर आता परमबीरसिंहही प्रतिनियुक्तीवर केंद्रात जाणार का?

राज्य सरकारशी छुपा वाद झाल्याने दोन अतिवरिष्ठ पोलिस अधिकारी गेल्या अडीच महिन्यात प्रतिनियुक्ती तथा डेप्यूटेशनवर केंद्रात गेले आहेत.

पिंपरी : राज्य सरकारशी छुपा वाद झाल्याने तीन अतिवरिष्ठ पोलिस अधिकारी गेल्या अडीच महिन्यात प्रतिनियुक्ती तथा डेप्यूटेशनवर केंद्रात गेले आहेत. त्यात राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, महासंचालक (नागरी संरक्षण दल) रश्मी शुक्ला आणि डीआयजी मनोजकुमार शर्मा यांचा समावेश आहे. तर, त्यांच्यापेक्षा उघड आणि मोठा जाहीर वाद नाही तर संघर्ष परमबीरसिंह यांचा झाला, असल्याने ते ही केंद्रात डेप्यूटेशनवर जाणार का याकडे लक्ष लागले आहे.

मुंबईच्या पोलिस आयुक्तांचा दर्जा हा डीजी लेवलचा आहे. त्यामुळेच राज्याचे हंगामी डीजी हेमंत नगराळे यांना मुंबई पोलिस आयुक्तपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर, मुंबई आयुक्तपदावरून परमबीरसिंह यांची डीजी (गृहरक्षक दल तथा होमगार्ड) बदली करण्यात आली आहे. त्यामुळे ते ही, जर राज्य सरकारशी झालेल्या मतभेदातून केंद्रात गेले, तर तीन महिन्यात राज्यातून केंद्रात जाणारे ते तिसरे नाराज डीजी ठरतील.

राज्य सरकारशी न पटल्याने जयस्वाल व शुक्ला जसे निमूटपणे केंद्रात गेले, तसे परमबीरसिंह हे गेले नाही. उलट उघड पंगा घेत राज्य सरकारलाच त्यांनी आज सर्वोच्च न्यायालयात खेचले. आपली बदली बेकायदेशीर कशी केली आहे. त्याची एक नाही, तर अनेक उदाहरणे देत त्यांनी बदलीला, आव्हान दिले आहेच. शिवाय राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराची तातडीने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अन्यथा पुरावे नष्ट केले जाण्याची भीती त्यांनी याचिकेत व्यक्त केली आहे. दोन वर्षाची टर्म पूर्ण न होता फक्त द्वेषातून आपली बदली केल्याचा दावा त्यांनी केला आहे. बदल्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे दोन निकाल पायदळी तुडवून आपली बदली राज्य सरकारने केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दोन्ही महासंचालकांनी वैतागून केंद्रात जाण्याचे मूळ हे पोलिसांच्या बदल्यातच दडले आहे. त्याला परमबीरसिंह यांच्या याचिकेतूनही दुजोरा मिळाला आहे. बदल्यांवरून खटके उडाल्याने प्रथम डीजीपी जयस्वाल हे नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात ७ जानेवारीला केंद्रात डेप्यूटेशनवर गेले. तर, त्यानंतर महिनाभराने ८ फेब्रुवारीला शुक्लांनीही त्यांचे अनुकरण केले. तर, काल, राज्य सुरक्षा महामंडळातील उपमहानिरीक्षक शर्मा हे सुद्धा प्रतिनियुक्तीवर गेले. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यातून वाद झाल्याने डीजीपी वैतागून केंद्रात गेल्याची चर्चा आहे. तर शुक्ला ही बदलीच्या बळी ठरल्या आहेत. 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे पैसे घेऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या करीत असल्याचा आरोप परमबीरसिंह यांनी याचिकेतही केलेला आहे. त्यात करण्यात आलेल्या दाव्यानुसार शुक्ला या राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी २४ व २५ ऑगस्ट २०२० ला देशमुख हे पैसे घेऊन बदल्या करीत असल्याचे राज्याचे तत्कालीन पोलिस महासंचालक जयस्वाल व राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणले होते. त्यावर कारवाई करण्याऐवजी उलट शुक्ला यांचीच बदली डीजी (सिव्हील डिफेन्स) या बिगर महत्वाच्या जागी करण्यात आली. 

त्यामुळे त्यांनीही त्रस्त होऊन लगेच डेप्यूटेशनचा मार्ग धरला. आता परमबीरसिंह यांनी. तर राज्य सरकारशी उघड आणि मोठा पंगा घेतल्याने त्यांनाही हाच मार्ग चोखाळावा लागतो की काय, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलभूत अधिकारांचे रक्षण व्हावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहेत. 
Edited By - Amol Jaybhaye 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in