प्रसाद लाड यांचा घोटाळा मंत्रालयात पोचलाय; लवकरच चौकशी लावू  - Prasad Lad's scam reaches ministry; Inquiry coming soon : Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

प्रसाद लाड यांचा घोटाळा मंत्रालयात पोचलाय; लवकरच चौकशी लावू 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहार ईडीला दिसत नाही का? 

पिंपरी : भय आणि भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देऊन पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपच्या साडेचार वर्षांच्या राजवटीत भ्रष्टाचार वाढला. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीचा स्मार्ट सिटीतील आर्थिक घोटाळा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे पोचला आहे. कोरोनाचे संकट आटोक्यात आल्याने त्याची आता चौकशी करू. तसेच, ईडीला फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचेच पत्ते माहित आहेत का. स्मार्ट सिटीतील गैरव्यवहार ईडीला दिसत नाही का? असा सवालही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. (Prasad Lad's scam reaches ministry; Inquiry coming soon : Sanjay Raut)

पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेच्या कामगिरीचा संजय राऊत यांनी आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, ईडी व सीबीआय या केंद्रीय यंत्रणांचा सूडबुद्धीने, द्वेषाने वापर करीत महाराष्ट्रातील राजकारण बिघडवले जात आहे. त्या माध्यमातून दहशत निर्माण करण्यात येत आहे. पण, हे फार काळ चालत नाही. अशी दहशत निर्माण करणाऱ्या नेत्यांचे नामोनिशाण मिटलेले आहे. केंद्रीय यंत्रणांकडे फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचेच पत्ते आहेत का, अशी विचारणा करीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटीत भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीने केलेला घोटाळा केंद्रीय तपास यंत्रणांना दिसत नाही का, असा प्रश्नही खासदार राऊत यांनी या वेळी केला.

हेही वाचा : राज्यात ५५ आमदारांवर मुख्यमंत्री होऊ शकतो, तर ५० नगरसेवकांवर महापौर का होणार नाही?

शिवसेना नेत्यांनी लाड यांच्यावर काय आरोप केले होते 
   
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या कंपनीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कामात ११० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. लाड यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली होती. 

कुठलाही लोकप्रतिनिधी वा त्याच्या कुटुंबातील सदस्याला सरकारी ठेका कायद्याने घेता येत नाही. तसं झालं तर संबंधित लोकप्रतिनिधीचे पद रद्द होते. या न्यायाने लाड यांच्या कुटुंबातील चार सदस्य संचालक असलेल्या क्रेस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि.ने पिंपरी पालिकेच्या स्मार्ट सिटीतील ५२० कोटी रुपयांचे काम घेतले आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी आमदार गौतम चाबूकस्वार, शहरप्रमुख अॅड सचिन भोसले आदी पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. याशिवाय या कामात या कंपनीने ११० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. 

आमदार लाड हे वरचेवर पिंपरीत येऊन जातात, यातूनही त्यांचा हेतू व सहभाग स्पष्ट होतो. मूळात या निविदेसाठी साडेतीनशे कोटी रुपयांची तरदूद होती. मग हे काम पाचशे वीस कोटींना दिलेच कसे अशी विचारणा त्यांनी केली, असा सवाल शिवसेना नेत्यांनी केला हेाता.

क्रेस्टल कंपनीने बाजारात १० ते १५ हजार रुपयांना मिळणारा पाण्याचा मीटर एक लाखाच्या भावाने असे नऊ हजार मीटर खरेदी केले. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीला ७३ कोटी रुपयांचा फटका बसला. सर्व्हर रुमच्या दोन फायरवॉलसाठी ११ कोटी रुपये जास्त मोजण्यात आले. २१ लाखाचा २५० केव्हीएचा डिझेल जनरेटर दोन कोटी ५८ लाख रुपयांना घेण्यात आला. या कंपनीने वेळेत काम पूर्ण न केल्याने तिला २५ ते ३० कोटी रुपयांचा दंड करण्याऐवजी तो फक्त काही लाखाचाच केला, असे गैरव्यवहाराचे आरोप या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आ. लाड यांच्या कुटुंबाच्या कंपनीवर केले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख