सहआयुक्त डॉ. शिसवे, उपायुक्त स्मार्तना पाटलांसह ७९९ जणांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह 

पोलिस दलाचे मनौधैर्य उंचावणारा हा बूस्टर डोस देत आपल्या गुणवान पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.
सहआयुक्त डॉ. शिसवे, उपायुक्त स्मार्तना पाटलांसह ७९९ जणांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह 
Dr. Ravindra Shiswe, Smartana Patil and 799 others honored with Director General of Police

पिंपरी : राज्यातील ७९९ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २०२० या वर्षासाठीचे पोलिस खात्यातील प्रतिष्ठेचे पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह तथा बोधचिन्ह (डीजीस इनसिग्नीया) आज जाहीर करण्यात आले. त्यात पोलिस शिपायापासून विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उत्तम कामगिरी आणि प्रशंसनीय सेवेसाठी हे सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रासह डीजीपीकडून दिले जाते. 

पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी कोरोना काळात आपल्या पोलिस दलाचे मनौधैर्य उंचावणारा हा बूस्टर डोस देत आपल्या गुणवान पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. हे सन्मानचिन्ह मिळालेले पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना महासंचालकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यात बहुतांश अधिकारी व कर्मचारी हे सतत १५ वर्षे निष्कलंक सेवा बजावलेले व गुन्हेगारी टोळ्याविरुद्ध कारवाई केलेले आहेत. राष्ट्रीय स्तरावर खेळात प्रावीण्य मिळविलेल्यांचाही त्यात समावेश आहे. 

पुण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हे सन्मानचिन्ह तथा बोधचिन्ह जाहीर झाले आहे. पुणे पोलिस दलातीलच उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे आदींना ते मिळाले आहे. तर, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर औताडे, पोलिस निरीक्षक अजय भोसले, उपनिरीक्षक तथा फौजदार महेश मतकर, तुकाराम खडके, हवालदार सतीश कुदळे, मंगलदास वालकोळी आदींचाही त्यात समावेश आहे. 

या यशाबद्दल पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. दोन्ही हवालदार आणि दोन्ही पोलिस निरीक्षक तथा पीआय यांना ते १५ वर्षे सतत उत्तम सेवाभिलेखाबद्दल, तर दोन्ही फौजदारांना गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध त्यांनी केलेल्या कारवाईसाठी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in