डॉ. तात्याराव लहानेंना फडणवीसांमुळे पद्मश्री मिळाली...  - Dr. Tatyarao Lahane gets Padma Shri due to Fadnavis : pravin darekar | Politics Marathi News - Sarkarnama

डॉ. तात्याराव लहानेंना फडणवीसांमुळे पद्मश्री मिळाली... 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

हे त्यांना शोभत नाही.

पिंपरी : "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यातील भाजप सरकारच्या कारकिर्दीत त्रास झाला, हे पद्मश्री, प्रख्यात नेत्रतज्ज्ञ, डॉ. तात्याराव लहाने यांचे वक्तव्य योग्य नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जशी एकमेकांची उणीदुणी चव्हाट्यावर काढतात, तशी ती डॉ. लहानेंसारख्या प्रशासनातील अधिकाऱ्याने काढणे, हे त्यांना शोभत नाही,'' असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (ता. 1 फेब्रुवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये सांगितले. 

समाजकंटकांच्या हल्यात चाकण येथे गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलिस रवींद्र करवंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी दरेकर पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

हा हल्ला शरम आणणारा आहे. आपल्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलिसाचीच सुरक्षा धोक्‍यात आली आहे, हे आपल्याला शोभा देणारे नाही, असे ते म्हणाले. पोलिसांवरच हल्ला झाला, तर त्याची दाद कोणाकडे मागणार? अशी विचारणा करून त्याबाबत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सरकारने असे प्रकार पुन्हा होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. 

डॉ. लहानेंच्या वक्तव्यावर बोलताना प्रशासनातील उणीदुणी त्यांनी बाहेर काढणे बरोबर नाही. त्याबाबत त्यांनी चार भिंतीच्या आत बोलायला पाहिजे होते, असे दरेकर म्हणाले. उलट फडणवीसांमुळे डॉ. लहानेंना पद्म श्री मिळालेली आहे, असा दावा त्यांनी केला. 

शिवसेनेच्या कथनी आणि करणीत फरक 

औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेवर शरसंधान करताना त्यांच्या करणी आणि कथनीत फरक आहे. औरंगाबाद महापालिकेत त्यांची सत्ता आहे, त्यामुळे त्यांनी तेथे नामांतराचा ठराव करावा. कॅबिनेटने निर्णय घ्यावा आणि केंद्राची मदत लागली, तर आम्ही पुढाकार घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. 

...तर राऊतांच्या पोटात दुखायचे काय कारण? 

फडणवीस यांच्या शब्दाला मान देऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपले उपोषण मागे घेतले, त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पोटात दुखायचे काय कारण? अशी विचारणा त्यांनी केली. अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला स्वार्थ साधता न आल्याने "सामना'तून टीका झाली, असे ते म्हणाले. 

केंद्रीय बजेट हे सर्वसमावेशक आणि सर्वसामान्यांचा विश्वास वाढवणारे आहे. मात्र विरोधी पक्षाला कावीळ झाली असल्याने त्यांना पिवळं दिसत आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली. 

प्रभूणेंच्या नोटिसीबद्दल विचारणा करणार 

पद्मश्री जाहीर झालेल्या गिरीश प्रभूणेंच्या मालमत्ता जप्ती नोटिसीशी पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा संबंध नसून ती पालिका प्रशासनाने बजावली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही ती का पाठवली याची विचारणा करण्यात येऊन पद्मश्रींचा सन्मान ठेवला जाईल, असे ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख