लोणावळा : कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ आणि मुंबई महानगरपालिकेचा माजी नगरसेवक सुनीत वाघमारे याला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. मात्र, गुन्हा लोणावळ्यात घडलेला असल्याने तो पुढील तपासासाठी पुणे जिल्ह्यातील लोणावळा पोलिसांकडे देण्यात आला आहे. पोलिसांनी वाघमारे याला आज (ता. 2 मार्च) वडगाव मावळ न्यायालयात उभे केले असता पाच तारखेपर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
नोकरी लावण्याच्या आमिषाने सुनीत याने लैंगिक अत्याचार करून फसवले आणि धमकावले, अशी फिर्याद एका अठ्ठावीस वर्षीय तरुणीने मुंबईतील भोईवाडा पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सुनीतने पीडितेस शैक्षणिक संस्था स्थापन करणार असून तिथे तुला नोकरी लावून देतो, असे आमिष देऊन जाळ्यात ओढले. तो विवाहित आहे. पण, त्याने आपले पत्नीशी पटत नसल्यामुळे घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले.
काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचे बंधू सुनीत वाघमारे संदर्भात @BJP4Maharashtra फार चिंतन करीत असल्याचे समजते.
माहितीसाठी-
सुनीत यांचा काँग्रेसशी कोणताही संबंध नाही. २०१७ साली मुंबई मनपा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 1, 2021
पीडित तरुणीला लग्न करण्याचे सुनीत याने वचन दिले होते. त्यानंतर पत्नीला घटस्फोट देण्यासाठी वकिलासोबत बैठक असल्याचे सांगून तो तिला लोणावळा येथे घेऊन आला. तेथे त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. त्याला तरुणीने विरोध केला असता जीवे मारण्याची धमकी देऊन स्वत: आत्महत्या करीन, अशी धमकी देऊन त्याने बळजबरीने पीडितेवर अत्याचार केला. "लिव्ह इन रिलेशनशीप'मध्ये राहण्यासाठी त्याने तिला मुंबईत एक फ्लॅटसुद्धा भाड्याने घेऊन दिला होता. तेथेच त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. नंतर, तिने लग्नाचा तगादा लावल्यामुळे त्याने तिला मारहाण केली. त्यामुळे तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान, सुनीतचा पक्षाशी कसलाही संबंध नसल्याचे कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेच्या 2007 च्या निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याने त्याला पक्षातून काढून टाकण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली.

