पिंपरी : वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेचे स्टीकर मोटारीवर असलेल्या एका मोटारचालकाने चक्क रिव्हॉल्वरच बाहेर काढल्याची खळबळजनक घटना पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी (ता. 29 जानेवारी) रात्री घडली. सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालेला हा व्हिडिओ ट्विट करीत या स्वैराचाराची गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक दखल घेतील का? अशी खोचक टिपण्णी करीत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज (ता. 30 जानेवारी) शिवसेनेवर शरसंधान साधले.
दरम्यान, याबाबत माजी खासदार नीलेश राणे यांनीही ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, चालत्या गाडीतून पिस्तूल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टीकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्रामध्ये?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
हे महाराष्ट्रातील पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आहे ! वाहनवरील लोगो हे सर्व सांगते ! शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का! @AnilDeshmukhNCP @DGPMaharashtra https://t.co/SaWy3UVuH6
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) January 29, 2021
एमएच-47 असा या गाडीचा अर्धवट नंबर असल्याने ती मुंबईतील बोरीवलीची असावी, असे "आरटीओ'तून सांगण्यात आले. मात्र, हत्यार उपसणारा हा कोण? शिवसेनेचा कार्यकर्ता की पदाधिकारी? अशी चर्चा सोशल मीडियात आता सुरु झाली आहे.
दरम्यान, या घटनेची चर्चा होऊन त्यावर एका खासदारांनीच ट्विट करताच पोलिसांनी आज या घटनेची दखल घेतली. खोपोली (जि. रायगड) पोलिस ठाण्यात याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या नंबरप्लेटवरून पोलिसांनी या मोटारचालकाचा शोध सुरु केला आहे.
चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्र मध्ये ?? pic.twitter.com/UAJBbAzVTu
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 30, 2021
एक्स्प्रेस वे तथा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गच नव्हे, तर पुणे-मुंबई महामार्गावरही शनिवार, रविवारी मोठी वाहतूक कोंडी होते. टोलनाक्यावर तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. या महिन्यातच मावळचे आमदार सुनील शेळके हेसुद्धा पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा टोलनाक्यावर या कोंडीत सापडले होते. तेव्हा ते स्वत मोटारीतून खाली उतरले. टोलनाक्यावरील बॅरिकेड्स हटवित त्यांनी वाहनांना वाट करून देत टोल नाक्यावरील कोंडी सोडवली होती.
मुंबईच्या या पठ्ठ्याने वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी चक्क रिव्हॉल्वरच समोरच्या आडव्या येत असलेल्या ट्रकचालकांवर उगारत कोंडीतून आपली सुटका करून घेतल्याने तो चर्चेचा विषय झाला.
खोपोली पोलिसांनी केली चौघांना अटक
दरम्यान, बंदुकीने धाक दाखवून मार्ग काढणाऱ्या चार जणांना खोपोली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी कारही ताब्यात घेतली आहे. संशयित आरोपींची नावे मात्र समजू शकली नाहीत. दूरचित्रवाहिन्यांचे कॅमेरे पाहून त्यांनी गाडीतून उतरुन पोलिस ठाण्यात पळ काढला. खोपोली पोलिस तपास करीत आहेत.

