...म्हणून गणेश नाईकांच्या आधी आशिष शेलार मंदा म्हात्रेंना भेटले! - ... so Ashish Shelar first met MLA Manda Mhatre! | Politics Marathi News - Sarkarnama

...म्हणून गणेश नाईकांच्या आधी आशिष शेलार मंदा म्हात्रेंना भेटले!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

पोलिसांचेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बळ वापरले तरी त्यांना मतदार वेळेवर उत्तर देईल. ​

नवी मुंबई : नवी मुंबईच्या राजकारणात आमदार गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. त्यांच्यातील या विसंवादाचा भारतीय जनता पक्षाला फटका बसू नये; म्हणून नवी मुंबईचे प्रभारी आशिष शेलार यांनी शहरात येताच सर्वप्रथम मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत पक्षसंघटनेबाबत चर्चा करीत एकजुटीने निवडणूक लढण्याचा निर्धार केला. 

दरम्यान, शेलार यांनी मंदा म्हात्रे यांची भेट घेतल्यानंतर गणेश नाईक, रमेश पाटील यांची भेट घेऊन जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या कार्यालयाला भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आढावा घेण्यासाठी शेलार नवी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी या दोन्ही गटाचे मनोमिलन व्हावे आणि आगामी निवडणुकीत एकत्रित काम करावे, यासाठी शेलार यांनी म्हात्रे यांची भेट घेत एकजुटीने लढण्याबाबत निर्णय घेण्यात आला. 

या वेळी बोलताना शेलार यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय पातळीवरील ताकद वापरली तरी जनता आमच्या बाजूनेच कौल देईल. आघाडीतील नेते एकमेकांचे पाय खेचत बसले आहेत. मात्र, आम्ही एकजूट आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकू, असा दावा शेलार यांनी केला. 

नवी मुंबई महापालिकेची ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे; मात्र ही प्रतिष्ठा राजकीय नसून नवी मुंबईतील नागरिकांना प्रतिष्ठेच्या सेवा देण्यासाठी असेल, असे शेलार यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईत आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे आणि रमेश पाटील असे तीन भाजप आमदारांचे तुल्यबळ नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची एकजूट भाजपकडे आहे. या सर्वांसोबत कार्यकर्त्यांची भेट घेऊन काटेकोर नियोजन करण्यासाठी हा दौरा केल्याचे शेलार यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीत एकमेकांचे पाय खेचण्याची रस्सीखेच सुरू आहे. या निवडणुकीत आमच्या ताकदीचा महाविकास आघाडीला फटका बसेल, असा विश्‍वास शेलार यांनी व्यक्त केला. भाजपकडून नवी मुंबईचा विकास हाच मुख्य मुद्दा असेल. बुलेट ट्रेनच्या गतीने नवी मुंबईचा विकास करू, अशी ग्वाही शेलार यांनी दिली. 

सध्या भाजपच्या माजी नगरसेवकांचे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये प्रवेशाच्या कार्यक्रमांवर बोलताना शेलार म्हणाले, की कोणी कितीही घाणेरडे आणि फोडाफोडीचे राजकारण केले, तरी त्याला जनता मतदानाच्या दिवशी उत्तर देईल. पोलिसांचेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बळ वापरले तरी त्यांना मतदार वेळेवर उत्तर देईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख