निवृत्त पोस्ट मास्टरचा किसान व बचत पत्र घोटाळा;  टोळीचा पर्दाफाश - Retired Postmasters Farmer and Savings Certificate Scam exposed by panvel police | Politics Marathi News - Sarkarnama

निवृत्त पोस्ट मास्टरचा किसान व बचत पत्र घोटाळा;  टोळीचा पर्दाफाश

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 जानेवारी 2021

किसान विकास पत्र राष्ट्रीय बचत पत्र बँकांमध्ये जमा करून कर्जाद्वारे सहा कोटींवर डल्ला मारण्याचा या टोळीचा डाव पनवेल शहर पोलिसांनी हाणून पाडला आहे. 

पनवेल : टपाल विभागातून निवृत्त झालेल्या सहायक पोस्ट मास्टरनेच तब्बल सहा कोटी रुपये रकमेची बनावट किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र तयार केल्याचे समोर आले आहे. ही पत्र बँकांमध्ये जमा करून कर्जाद्वारे सहा कोटींवर डल्ला मारण्याचा या टोळीचा डाव पनवेल शहर पोलिसांनी हाणून पाडला आहे. 

पनवेलचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला बाबाराव गणेशराव चव्हाण हा नांदेड येथे निवृत्त सहायक पोस्ट मास्टर होता. तिथे हेराफेरी केल्याने त्याला निलंबित केले असून गुन्हेही दाखल आहेत. त्याच्यासह सुप्रभात मल्लनप्रसाद सिंग, संजयकुमार अयोध्या प्रसाद व दिनेश रंगनाथ उपाडे यांना अटक करण्यात आली आहे.

बाबाराव चव्हाण याला किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्रविषयी सर्व माहिती असल्याने तो इतर काही जणांना हाताशी धरून हे काम करत होता. खोटी नावे व सह्यांची बनावट कागदपत्रे तयार करून बँकांचीही फसवणूक करत होता. ही कागदपत्रे बँकांमध्ये जमा करून कर्ज घेतले जात होते. 

पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेलमधील एचडीएफसी सर्कल येथे दोघेजण बनावट कागदपत्रांसह येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे व पोलीस सह निरीक्षक राहुल सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे यांच्या टीमने सापळा रचला. दोघे संशयित आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतल्यानंतर भारतीय डाक विभागाची दोन किसान पत्र व सात बचत पत्र आढळून आली. याबाबत अधिक तपास केल्यानंतर ही पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या दोघांसह त्यांचे सहकारी असलेल्या इतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

ही बनावट कागदपत्रे बँकांमध्ये जमा करून कर्ज घेतले जात होते. त्यांनी अशाचप्रकारे नेरूळ येथील विश्वास नागरी पतसंस्थे 50 लाखांची पत्र जमा करून 12 लाखांचे कर्ज घेतले आहे. तसेच माहिम येथील एचडीएफसी बँक येथे दोन कोटी व कुर्ला येथील कुर्ला नागरी सहकारी बँकेत एक कोटी रुपये किंमतीची बनावट पत्र जमा केली आहेत. पण या बँकांमधून त्यांना अद्याप कर्ज मिळालेले नाही. 

पाच कोटी 89 लाख 15 हजारांची बनावट पत्र जप्त

बनावट किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र बनविणाऱ्या टोळीकडून एकुण पाच कोटी 89 लाख 15 हजार रुपये किंमती पत्र जप्त करण्यात आली आहे. त्यांनी आणखी किती बँकांमध्ये अशी बनावट पत्र जमा करून कर्ज घेतले आहे, याचा तपास केला जात आहे. या घोटाळ्यात बँकांचा सहभाग असल्याचे समोर आले नसले तरी कागदपत्रांची शहानिशा न करता त्यांना कर्ज देणाऱ्या बँकांचीही चौकशी केली जाणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख