त्या चांडाळ चौकटीचे नेते राम कदम, त्यांना अटक करा

संघटनेचे कायदे सल्लागार भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या असून, याप्रकरणी कदम यांच्यावर कारवाई करावी.
Ram kadam.jpg
Ram kadam.jpg

मुंबई : कला दिग्दर्शक राजू साप्ते (Raju Sapte) आत्महत्या प्रकरण हे बॉलिवूड मधील कामगार संघटनांच्या दादागिरीमधून उद्भवले असून, त्या चांडाळ चौकडीचे नेते भाजप आमदार राम कदम (Ram kadam) आहेत, असा आरोप शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी आज येथे केला. (Ram Kadam, the leader of that Chandal Chowk, arrest him)

संघटनेचे कायदे सल्लागार भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या असून, याप्रकरणी कदम यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विद्या चव्हाण यांनी केली. 

या गुंडगिरीप्रकरणी आपण वर्षभर अनेक ठिकाणी दाद मागितली असून, कोणाही वरिष्ठ अधिकाऱ्याने याप्रकरणात लक्ष घातले नाही, असेही वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी पत्रकारांना सांगितले. या संघटनेचे मूळ पदाधिकारी निशांत सकपाळ हे देखील आज हजर होते, ही संघटना आता या परप्रांतीय चांडाळ चौकडीने बेकायदा ताब्यात घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. या कामगारांसाठी संघर्ष करणाऱ्या विद्या चव्हाण देखील यावेळी उपस्थित होत्या. 

फिल्म स्टुडिओज सेटींग अँड अलाईड मजदूर युनियनचे नेतृत्व अभिनेता मिथून चक्रवर्ती यांच्याकडे असेपर्यंत कामगारांचे हित जपले जात होते. त्यांनी नेतृत्व सोडल्यानंतर गांगेश्वरलाल श्रीवास्तव, राकेश मौर्या, अशोक दुबे, बी. एन. तिवारी यांनी संघटनेचा ताबा बेकायदेशीररित्या घेतला आहे. ही मंडळी संघटनेचे नियम पाळत नसून सभा घेणे, हिशोब सादर करणे, रिटर्न फाईल करणे, निवडणुका घेणे या बाबी त्यांनी टाळल्या आहेत.

यासंदर्भात मी स्वतः संबंधित सरकारी निबंधक, विभागाचे पोलिस उपायुक्त, चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा आदींकडे तक्रारी केल्या. औद्योगिक न्यायालयातही याबाबत तक्रार याचिका सादर केली आहे. मात्र कोठेही यासंदर्भात कारवाई झाली नाही, असे कीर्तीकर यांनी सांगितले. 

बॉलीवूडमध्ये किमान 22 प्रकारची कामे करणारे पन्नास हजारांच्या आसपास कामगार असून, त्यांचा नव्वद कोटी रुपयांचा निधीही संघटनेच्या ताब्यात आहे. या पैशांच्या जोरावरच संघटनेने सरकारी अधिकाऱ्यांना गप्प केल्याचा आरोपही कीर्तीकर यांनी केला. या संघटनेचे राजकीय बॉस भाजप आमदार राम कदम असून, आपण हे प्रकरण धसास लावू, असेही त्यांनी बोलून दाखवले. 

तर साप्ते यांना दोन कोटी रुपयांसाठी धमकी देण्यात आली, अन्यथा सेट तोडून काम बंद पाडू, अशीही तंबी देण्यात आली. यापूर्वीही चंद्रवदन मोरे यांनाही अशीच धमकी देऊन त्यांचे काम तीन वर्षे बंद पाडण्यात आले. त्यातच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. संघटनेची ही दादागिरी राम कदम यांच्याच जोरावर चालत असून, किरीट सोमैय्या हे त्यांचे कायदे सल्लागार आहेत, असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला. 

फिल्मसिटी युपी मध्ये नेण्यासाठी

बॉलीवूडचा पसारा उत्तर प्रदेशात नेण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरु आहे. भाजपच्या राज्यातही चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस यांनीही या संघटनेला क्लीनचिट दिली होती, असा आरोपही श्रीमती चव्हाण यांनी केला. या दादागिरीप्रकरणी कदम यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com