वाशी टोलनाका तोडफोडप्रकरणी राज ठाकरेंना जामीन मंजूर   - Raj Thackeray granted bail in Vashi Tolanaka case | Politics Marathi News - Sarkarnama

वाशी टोलनाका तोडफोडप्रकरणी राज ठाकरेंना जामीन मंजूर  

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

राज ठाकरे यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे.

नवी मुंबई : वाशी टोलनाका तोडफोडप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर २०१४ मध्ये वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आज राज ठाकरे यांना जामीन मिळाला आहे. आज राज ठाकरे स्वतः वाशी कोर्टात हजर झाले. 

राज ठाकरे यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे. यानंतर कोर्टाकडून साक्षीदारांना समन्स देण्यात येईल आणि केसला सुरवात होईल. यापुढे राज ठाकरे यांना सुनावणीसाठी यावं लागणार नाही. असे विकालांनी सांगितेल. यावेळी राज ठाकरेंसोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, गजानन काळे उपस्थित होते. 

वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर २०१४ मध्ये वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अनेक वेळा पोलीसांनी समन्स पाठवूनही राज ठाकरे उपस्थित न राहिल्याने बेलापूर न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंट काढले होते. त्यामुळे राज ठाकरे आज स्वतः न्यायालयात हजर राहिले. 

वाशीमध्ये राज ठाकरे यांनी 26 जानेवारी 2014 रोजी भडकावणारे भाषण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची बेलापूर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 

कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत...
 
वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट बजावले होते. त्यामुळे राज ठाकरे आज बेलापूर न्यायालयात हजर झाले. या निमित्तानं मनसेने नवी मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीच्या तोंडावर जोरदार शक्तीप्रदर्शन केले. 

सकाळी 11 वाजता राज ठाकरे नवी मुंबईत दाखल झाले. राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आल्याने राजकीय फायदा मनसेला होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यासाठी सोशल मीडियावरुन मनसैनिकांना आवाहन करण्यात आले होते. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी स्वतःवर शेकडो गुन्हे घेतलेला पहिला नेता...महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे...

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख