शिवसेनेत होणाऱ्या प्रवेशावर राष्ट्रवादी नाराज; नियमांचे उल्लंघन होत असल्याची टीका - NCP angry over Shiv Sena entry; Criticism of violating the rules | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेत होणाऱ्या प्रवेशावर राष्ट्रवादी नाराज; नियमांचे उल्लंघन होत असल्याची टीका

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 28 जानेवारी 2021

कोणत्या पक्षाला कोणता प्रभाग देणार यासंदर्भात चर्चा झालेली आहे.

वाशी : नवी मुंबई महानगरपालिकेवर आमदार गणेश नाईकांची 25 वर्षांपासूनची एकहाती असणारी सत्ता खेचून आणण्यासाठी महाविकास आघाडीने वज्रमूठ बांधली आहे. त्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या बैठकाही सुरु झाल्या आहेत. मात्र, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्याचा शिवसेनेने सपाटा लावला आहे. त्यावरून महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रसेने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त शिवसेना नियमाला बगल देत असल्याचा आरोप केला आहे.

एकंदरीतच निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत रुसवे-फुगवे सुरू झाले आहेत. शिवसेनेत होत असलेले प्रवेश पाहता नवी मुंबईत सेना स्वबळ अजमावण्याची शक्यता र्वतविली जात आहे.

ऐरोली स्पोर्टस कॉम्पलेक्‍समध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीत ‘दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देताना विचारविनिमय करुन घेण्याचे ठरले होते.’ पण, शिवसेनेने मागील दोन आठवड्यांपासून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत पक्ष प्रवेश करून घेताना विचारविनिमय केलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेने दुसऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना विचारविनिमय न करता पक्षात प्रवेश देणे, हे नैतिकतेचे नसल्याची प्रतिक्रिया दिघा येथील प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी कॉग्रसेचे हेमंत खारकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांची तारीख जाहीर होऊन आचरसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नवी मुंबईतील राजकारण रंगू लागले असून पक्षांतर करणाऱ्ंयाचे प्रमाण वाढले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेवरील गणेश नाईकांची एकहाती सत्ता खेचून काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या बैठका सुरु झाल्या आहेत. 

त्या बैठकांमध्ये कोणत्या पक्षाला कोणता प्रभाग देणार यासंदर्भात चर्चा झालेली आहे. मात्र तरीदेखील शिवसेनेकडून भाजपच्या चार माजी नगरसेवकांना शिवसेनेमध्ये प्रवेश देत पालिकेच्या निवडणुकीत तिकिट देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पण, महाविकास आघाडीच्या बैठकीत जे प्रभाग शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेसच्या वाट्याला जाणार आहे, हे ठरलेले असताना दुसऱ्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देणे, हे नैतिकतेचे नसल्याची टिका शिवसेनेवरवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. 

शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीने भाजपच्या माजी नगरसेवकांना पक्षात घेत आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेचे पालिका निवडणुकीत ‘एकला चलो रे’ भूमिका घेण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख