मुख्यमंत्र्यांच्या महाड दौऱ्यानंतर तीन तासांत जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय!

म्हाडातर्फे होणार पुनर्वसन
मुख्यमंत्र्यांच्या महाड दौऱ्यानंतर तीन तासांत जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad- Taliye
;

मुंबई : तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची काळजी करू नका, असे आवाहन तळीये (Taliye, Tal- Mahad) येथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray visits Taliye) यांनी करून तीन तास होण्याच्या आतच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी तेथील नागरिकांना दिलासा देणारा प्रत्यक्ष निर्णय जाहीर केला. 

``कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती,``अशी घोषणा करत आव्हाड यांनी एक पाऊल पुढे टाकले. म्हाडातर्फे असे एखादे गाव पुनर्वसित करण्याचा हा पहिलाच निर्णय असावा. या घरांचा संभाव्य आराखडाही आव्हाड यांनी शेअर केला आहे. 

असे असणार घर

तळीये हे गाव डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. 24 जुलै रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास या गावावर दरड कोसळल्याने त्या खाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 44 वर पोहोचला. पावसामुळे हे बचावकार्य दुसऱ्या दिवशी सुरू झाले होते. त्याबद्दल स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर आज शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गावात भेट दिली आणि तेथील नागरिकांचे सांत्वन केले. या दुर्घटनेत ज्यांचे नुकसान झाले त्या सर्वांचे पुनर्वसन करण्यात येईल. त्यांची सर्व कागदपत्रे त्यांना मिळवून देण्यात येणार आहेत. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सर्व मदत करू. फक्त तुम्ही स्वत:ला सावरा, असे आवाहन या वेळी मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत या आधीच जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले? 

डोंगर उतारावरील सर्व वस्त्यांचे पुनर्वसन केले जाणार असून आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.  मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत, ‘तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ’ अशी ग्वाही दिली. आजकाल पावसाळ्याची सुरुवातही चक्रीवादळाने होते. अशा घटना पाहता डोंगर- उतार व कडे-कपाऱ्यांतील वाड्या-वस्त्यांचे स्थलांतर करण्याचे नियोजन करण्यात येईल. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाळ्यात नद्यांचे पाणी वाढून पूर परिस्थिती उद्भवते. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी जल आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सरकारतर्फे गावकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल तसेच त्यांचे पुनर्वसन केले जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. गावकऱ्यांनी काळजी करू नये, अशा शब्दांत त्यांनी दिलासा दिला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in