kdmc, thane and mira bhayandar municipal corporations extended corona lockdown | Sarkarnama

कल्याण, डोंबिवली, ठाण्यासह मीरा-भाईंदरमध्ये वाढला लॉकडाउन

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 जुलै 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आता अनेक शहरांमध्ये लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. कल्याण, डोबिंवली, ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. 

मुंबई : ठाणे शहरात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे महापालिकेने शहरात 2 जुलैपासून 12 जुलैपर्यंत टाळेबंदी लागू केली. या टाळेबंदीत आणखी आठ दिवसांची वाढ करून 19 जुलैपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचे पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. याचबरोबर केडीएमसी आणि मीरा-भाईंदर महापालिकेनेही कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. 

अनलॉक जाहीर झाल्यापासून ठाणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. झोपडपट्टीपाठोपाठ अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. बाळकुम, कोळशेत, मानपाडा, नौपाडा, कोपरी, वर्तकनगर आदी भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशावेळी सुरुवातीला ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी 2 ते 12 जुलै अशी 10 दिवस टाळेबंदी लागू केली. टाळेबंदीच्या कालावधीत शहरातील अंतर्गत रस्ते बंद राहणार असून, प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. या शिवाय शहरातील किराणा मालाची दुकाने, इतर साहित्याची दुकाने, भाजी मार्केट हे सर्व देखील या कालावधीत बंद राहणार आहेत. कोणालाही विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही. 

केडीएमसीमधेही 19 जुलैपर्यंत वाढ

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही 19 जुलैच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लॉकडाउनमध्ये वाढ करण्यात आली आहे. सध्या सुरु असलेले लॉकडाउन बारा जुलैपर्यंत जाहीर करण्यात आले होते. या नवीन लॉकडाउनमधेही पूर्वीप्रमाणेच जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने अत्यावश्‍यक सेवा तसेच या संदर्भातील वाहनांना या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. दोन जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊननंतर शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत काहीशी घट झाली होती. मात्र, मागील तीन दिवसांपासून शहरात सरासरी पाचशे ते साडेपाचशे इतकी रुग्णसंख्या आहे.   

मिरा-भाईंदरमध्येही सात दिवसांची वाढ 

मिरा-भाईंदरमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सात दिवसांनी लॉकडाउन वाढविण्यात आल्याचे आज जाहीर करण्यात आले. लॉकडाऊन लागू असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालिका आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. मिरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊनची आज रात्री 12 वाजता मुदत संपत असतानाच पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी पुन्हा एकदा सात दिवसांसाठी लॉकडाउन वाढवत असल्याचा आदेश जाहीर केला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख