विरोधकांचे खरंच राईट आहे.....खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे...! - Jitendra Awhad reply to BJP leaders criticizing Chief Minister Uddhav Thackeray through poem | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

विरोधकांचे खरंच राईट आहे.....खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे...!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

इमान तर विकले नाहीच... ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या.....

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि तो रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या मुद्यावरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कवितेच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या थाळ्या वाजवायला लावल्यापासून पीएम केअर्स फंडाला देण्यापर्यंतचा उल्लेख करत भाजप नेत्यांची खिल्ली उडवली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर ही कविता पोस्ट करत भाजप नेत्यांवर टीका केली आहे. त्यांची ही कविता....

खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!
कधी थाळ्या वाजवायला 
लावल्या नाही...
ना कधी मेणबत्या आणि दिवे 
लावायला लावले .....
निर्णय घेताना घेतले 
विश्वासात.....
विरोधकांचे त्यामुळेच
फावले.......
शांत राहून तो लढत आहे
विरोधकांचे खरंच राईट आहे....
खरंच...हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे....!!
मंदिर उघडा, बाजार उघडा
शाळा उघडा ते म्हणाले.....
परीक्षा पुढे ढकलल्या तर
ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले....
कोरोना वाढला तर ते आता
फक्त सरकारला दोषी ठरवत आहे...
विरोधकांचे खरंच राईट आहे....
खरंच...हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे....!!
इमान तर विकले नाहीच
ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या.....
कोरोनाचे आकडे लपवले नाहीच
खोट्याने न कधी माना झुकल्या....
घरी पत्नी आणि मुलगा
आजारी असतांना तो मात्र लढत आहे....
विरोधकांचे खरंच राईट आहे....
खरंच...हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे....!!
ना कुठे बडबोले पणा
ना कशाचा बडेजाव..
आठ हजार कोटीचे
विमान नको....
ना कोणत्या प्रकरणात
घुमजाव......
जे करतोय ते प्रामाणिक पणे
तो करतो आहे.....
विरोधकांचे खरंच राईट आहे....
खरंच...हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे....!!
व्यापाऱ्यांचे ऐकून घेतोय...
विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय....
गोर गरीब जनतेला
एकवेळ शिवभोजन मोफत देतोय....
निसर्ग चक्रीवादळ,कोरोना संकट
शेतकऱ्यांच्या अडचणी 
साठी तो शांततेत लढतो आहे ......
विरोधकांचे खरंच राईट आहे....
खरंच...हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे.....!!
ना क्लीन चिट देता आली...
ना खोटी आकडे वारी देता आली...
निवडणूक काळात तर कधी
ना अशक्य घोषणा त्याला करता आली...
जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय...
विरोधकांचे खरंच राईट आहे....
खरंच...हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे....!!
महाराष्ट्राचे मीठ खाऊन
निधी पंतप्रधान निधीला ते देताय...
उठ सूठ, सकाळ संध्याकाळ 
ते टीका सरकार वर करताय.....
तो मात्र टिकेला उत्तर न देता
सर्वसामान्यांसाठी झटत आहे...
विरोधकांचे खरंच राईट आहे....
खरंच...हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे....!!

या कवितेच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या धीरोदत्त स्वभावाचे कौतुक करत भाजप नेत्यांची मात्र खिल्ली उडवली आहे.  उद्धव ठाकरे यांनी कधीही थाळ्या वाजवायला लावल्या नाहीत. कोणताही निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेतले, त्यामुळेच विरोधकांचे फावले. मंदिरं उघडा, शाळा सुरू करा, असे म्हणत विरोधक कोरोनाच्या संकटकाळातही रस्त्यावर उतरले. मात्र, कोरोना वाढताच ते आता मुख्यमंत्र्यांना दोष देत आहेत. कोरोनाचं निमित्त साधून त्यांनी ना कंपन्या विकल्या ना कोरोनाचे आकडे लपवले, असा टोला आव्हाड यांनी विरोधकांना लगावला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख