खासगी डॉक्‍टरांना पालिकेच्या कारवाईची धास्ती 

महापालिका कारवाई करेल, या भीतीने अनेक खासगी डॉक्‍टर रुग्णांना कोरोना चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शन देण्यास टाळाटाळ करत आहेत.
 खासगी डॉक्‍टरांना पालिकेच्या कारवाईची धास्ती 

मुंबई: कोरोना चाचणी नियमावलीत गोंधळ असल्याने रुग्णांसह डॉक्‍टरांनाही फटका बसत आहे. कोव्हिड-19 चाचणी करायची असल्यास चाचणीसाठी डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्‍यक असते; परंतु कोरोना रुग्णाच्या कुटुंबासह संपर्कातील किंवा अतिजोखमीच्या व्यक्तींना चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शन मिळत नसल्याने वेळेत उपचार घेणे कठीण झाले आहे. 

महापालिका कारवाई करेल, या भीतीने अनेक खासगी डॉक्‍टर रुग्णांना कोरोना चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शन देण्यास टाळाटाळ करत आहेत. क्वारंटाईन व्हावे लागेल, या भीतीने संशयित रुग्ण महापालिका-सरकारी रुग्णालयांत जाण्यास तयार होत नाहीत.
 
इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार कोरोना चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शन दिलेल्या 20 डॉक्‍टरांवर महापालिकेने कारवाई केली आहे. त्यापैकी बहुतेक डॉक्‍टर कुर्ला येथील आहेत. कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींना चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शन दिल्यामुळे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाले आहे. त्याबद्दल कारवाई का करू नये, अशी विचारणा करत महापालिकेने या डॉक्‍टरांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. 

आयएमएने सरकारसोबत चर्चा केल्यानंतर महापालिकेने अखेर नोटिसा मागे घेतल्या. याआधी फॉर्ममध्ये गोंधळ असल्याने खासगी डॉक्‍टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहून न देण्याचा निर्णय घेतला होता. तो फॉर्म रद्द करून आता नवीन फॉर्म तयार करण्यात आला आहे.

नवीन नियमावलीनुसार महापालिकेने सरकारी रुग्णालयांसह आता खासगी डॉक्‍टरांनाही कोव्हिड चाचणीसाठी परवानगी दिली आहे. त्यासाठी काही नवीन अटींचा समावेश करण्यात आला आहे. तपासणीच्या पाच दिवसांपर्यंत रुग्णांमध्ये कोव्हिड-19 ची लक्षणे नसतील, तर चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शन लिहून देता येणार नाही. यातून आरोग्य कर्मचारी, गरोदर महिला, कर्करुग्ण आणि दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींना वगळण्यात आले आहे.

अनेक कोरोनाबाधितांचे नातेवाईक वयस्कर किंवा गंभीर आजारांनी ग्रस्त असतात. अशा लोकांना दवाखान्यांपर्यंत जाणे शक्‍य नसते. म्हणून त्यांच्या इमारतींपर्यंत जाऊन तपासणी केल्यावर प्रमाणपत्र देणे सुरू केले आहे, असे डॉ. निखिल कुलकर्णी यांनी सांगितले. 

ऑनलाईन प्रिस्क्रिप्शन लिहून देणे टाळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजारी व्यक्तीला डॉक्‍टरांनी कोरोना चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्यास दुर्लक्ष करून चालणार नाही. ऑनलाईन कन्सल्टेशनला परवानगी असताना ऑनलाईन प्रिस्क्रिप्शनला का नाही, असा प्रश्‍न डॉ. शाहिद बरमारे यांनी उपस्थित केला.

रुग्णांची अडचण
सरकारने नव्याने जारी केलेल्या फॉर्ममध्ये रुग्णांची संपूर्ण माहिती, लक्षणे आणि चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळेचे नाव लिहिणे आवश्‍यक आहे. फॉर्ममध्ये उल्लेख केलेल्या प्रयोगशाळेतच चाचणी करणे गरजेचे असून, तेथे गर्दी असल्यास इतर प्रयोगशाळेत चाचणी करता येणार नाही.

रुग्णाला दुसऱ्या प्रयोगशाळेत चाचणी करायची असल्यास डॉक्‍टरकडून तसे प्रिस्क्रिप्शन लिहून घ्यावे लागेल. त्यामुळे रुग्णांसमोर अनेक अडचणी येत असून, त्यांची फरपट होत आहे.

प्रशासनाने उत्तर द्यावे
कोव्हिडबाधितांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तीला चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शन लिहून दिले होते, असे महापालिकेची नोटीस मिळालेले डॉ. चेतन वेलानी यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना आपली चाचणी करून खात्री करावीशी वाटते. होम क्वारंटाईन असलेल्या अशा व्यक्ती घराबाहेर येऊन किंवा डॉक्‍टरकडे चाचणी कशी करणार, याचेही उत्तर प्रशासनाने द्यावे, असेही ते म्हणाले.

महापालिकेने काही डॉक्‍टरांना कारणे दाखवा नोटिसा बजावून कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे डॉक्‍टरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परिणामी अनेक डॉक्‍टरांनी रुग्णांना प्रिस्क्रिप्शन लिहून न देण्याचा निर्णय घेतला. 
- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए.

एखाद्या रुग्णाला चाचणीची गरज असल्यास प्रिस्क्रिप्शन लिहून देण्यास हरकत नाही; परंतु अनेक खासगी डॉक्‍टर गरज नसताना कोव्हिड-19 चाचणी करण्यास सांगतात. ऑनलाईन प्रिस्क्रिप्शन लिहून देण्यास महापालिकेने मनाई केली असून, रुग्णाने उपस्थित राहून तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
- डॉ. दक्षा शाह, उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com