बदलापूर : बदलापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढत आहे. ही ताकद आणखी वाढवून युवा शक्तीच्या बळावर कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा लढवाव्या लागतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी केले. देशमुख यांच्या या वक्तव्याने बदलापूरमध्ये राष्ट्रवादीने स्वबळाची तयारी केल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले निवडून आलेल्या प्रभागात काही दिवसांपूर्वी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी यापुढे या प्रभागातून शिवसेनेचा नगरसेवक निवडून येईल, असा दावा केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दामले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेवर नाराज असलेली बदलापूर राष्ट्रवादी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारी त्याच भूमिकेत आहेत.
बदलापूर शहरातील 20 तरुणांनी प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या वेळी या युवकांचे स्वागत करून देशमुख यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी बोलताना देशमुख यांनी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तरुणांनी जोमाने सक्रिय व्हावे असे आवाहन केले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, शहर उपाध्यक्ष दिनेश धुमाळ, जिल्हा सेवा दल कार्याध्यक्ष हेमंत यशवंतराव, महिला शहर अध्यक्षा अनिसा खान, कामगार सेलचे शहराध्यक्ष सूर्यराव, ज्योती वैद्य, ज्योती बैसणे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मानकीवली भागात वृक्षारोपण करण्यात आले. शहर उपाध्यक्ष दिनेश धुमाळ यांनी आयोजित केलेल्या या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत मानकीवली भागातील इमारतींलगत तसेच रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आले.

