मराठी शाळांना ५० टक्के सवलत, वसाहत शुल्कांबाबत सिडकोचा निर्णय

सिडको महामंडळ हे नवी मुंबई क्षेत्रासाठी आणि सिडकोने विकसित केलेल्या नवीन औरंगाबाद, वाळूज महानगर, नवीन नाशिक, नवीन नांदेड यांसारख्या शहरांकरिता 'नवीन नगर विकास प्राधिकरण' म्हणून कार्यरत आहे.
Education.jpg
Education.jpg

नवी मुंबई : मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या नवी मुंबई आणि सिडकोच्या नवीन शहर प्रकल्पांतील शिक्षण संस्थांना विविध प्रकारच्या वसाहत शुल्कांमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीचा प्रसार आणि संवर्धन करण्यामध्ये मराठी शाळा महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याने त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सिडकोच्या संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (CIDCO's decision regarding 50% discount for Marathi schools, settlement fees)

सिडको महामंडळ हे नवी मुंबई क्षेत्रासाठी आणि सिडकोने विकसित केलेल्या नवीन औरंगाबाद, वाळूज महानगर, नवीन नाशिक, नवीन नांदेड यांसारख्या शहरांकरिता 'नवीन नगर विकास प्राधिकरण' म्हणून कार्यरत आहे. शहराचा सर्वंकष विकास करण्याच्या दृष्टीने सिडकोकडून विकास प्रकल्पांप्रमाणेच सामाजिक उद्देशाकरिताही भूखंडांचे वाटप करण्यात येते. यानुसार पूर्व प्राथिमक शाळांपासून ते पदवी आणि व्यावसायिक महाविद्यालये उभारण्याकरिता सिडकोकडून नवी मुंबई आणि नवीन शहरांमध्ये सामाजिक भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे.

नवी मुंबईमध्ये एकूण ११७ भूखंडांचे वाटप सिडकोकडून शिक्षण संस्थांना करण्यात आले आहे. नवी मुंबईकरिता 'नवी मुंबई जमिनी विनियोग अधिनियम २००८ आणि नवीन शहरांकरिता १९८२ च्या जमिनी विनियोग अधिनियमानुसार भाडेपट्टा कराराने भूखंडांचे वाटप करण्यात येते. भाडेपट्टा कालावधीच्या काळात या संस्थांकडून शिल्लक भाडेपट्टा आकार, विलंब माफी शुल्क, मुदतवाढीसाठी अतिरिक्त अधिमूल्य, अतिरिक्त चटई क्षेत्र मंजूर करण्याकरिता अतिरिक्त अधिमूल्य इ. वसाहत शुल्के आकारण्यात येतात.

शाळांना मोठा दिलासा

बऱ्याचदा मराठी माध्यमाच्या शाळांना आर्थिक पेचप्रसंगांचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा पुरवणे कठीण होते. या बाबी लक्षात घेऊन सिडकोकडून हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे कोविड-१९ व टाळेबंदीच्या काळात आर्थिक संकटाचा सामना कराव्या लागलेल्या मराठी माध्यमाच्या शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 

हेही वाचा..

विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल

शहरांचे नियोजन म्हणजे केवळ इमारती उभ्या करणे नसून कम्युनिटी डेव्हलपमेंट हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच अनुषंगाने रस्ते व इमारतींबरोबरच कला, क्रीडा, संस्कृती, शिक्षण इत्यादींच्या विकासासाठीही सिडको कार्यरत असून मराठी भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे, हे सरकारचे धोरण आहे. याचसाठी अशा शाळांना वसाहत शुल्कांमध्ये सवलत देण्याबाबत सिडकोने निर्णय घेतला असून त्याचा मोठा फायदा या शाळांना आणि विद्यार्थ्यांना होईल.
- एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

मराठीचा प्रसार करण्यासाठी...

मराठीचा प्रसार व संवर्धनाकरिता महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळांना वसाहत शुल्कांमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या शाळांना विद्यार्थी विकासाच्या अन्य बाबींवर लक्ष केंद्रित करणे सुलभ होणार आहे.
- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको
 

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com