bjp leader gopal shetty criticizes ncp president sharad pawar | Sarkarnama

खासदार गोपाळ शेट्टी म्हणतात, शरद पवारांनी इगो बाजूला ठेऊन मोदींची मदत घ्यावी !

सरकारमाना ब्युरो
मंगळवार, 21 जुलै 2020

मंदिर बांधणे आणि कोरोनाचा संसर्ग या संदर्भात शरद पवार यांनी केलेल्य विधानावरुन भाजपकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे. आज एका भाजप खासदाराने शरद पवार यांनी मोदींचा सल्ला घ्यावा, असे म्हटले आहे. 

मुंबई : मंदिराचे बांधकाम आणि कोरोना संसर्ग या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानावर भाजपकडून टीका सुरू आहे. याचबरोबर पवार यांना भाजप नेते लक्ष्य करु लागले आहेत. आता उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी पवारांवर टीका केली आहे. राज्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत घ्यावी, असा सल्लाही शेट्टी यांनी दिला आहे. 

शरद पवारांच्या विधानामुळे मी आश्चर्यचकीत झालो आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. मात्र, राम मंदिराच्या भूमिपूजनामुळे कोरोनाही जाईल व 2024 च्या निवडणुकीत विरोधकांच्या जागाही कमी होतील, याची जाणीव पवारांना आहे, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी पवार व राज्य सरकारमधील अन्य धुरीणांनी आपला इगो बाजूला ठेऊन मोदी यांची मदत घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती वा कोणत्याही समाजाचे लोक असले तरी ते संकटात सापडले देवाचा धावा करतात. सर्वजण आपापल्या देवाची पूजा करतात. शरद पवार हे देवपूजा करतात की नाही हे मला ठाऊक नाही, पण जगातील कोणत्याही धर्माला मानणारे लोक संकटात देवाची आठवण काढतात. अशा वेळी शरद पवार यांनी असे विधान करणे योग्य नाही, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे. 

खरे पाहता पवारांच्याच इशाऱ्याने व मार्गदर्शनाने महाराष्ट्राचे सरकार चालले आहे, तरीही महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वाढतोच आहे. तुम्ही तीन पक्षांनी मिळून यावर गंभीरपणे कृती करावी. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी व अमित शहा यांची मदत घेऊन दिल्लीत कोरोनावर नियंत्रण ठेवले तसे तुम्हीही सारे इगो बाजूला ठेवून मोदींना विनंती करा व महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव कसा कमी होईल, यासाठी प्रयत्न करा, असेही शेट्टी यांनी नमूद केले आहे. 

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या संबंधित अग्रलेखाचाही शेट्टी यां नी यावेळी समाचार घेतला. मंदिर वही बनाएंगे पर तारीख नही बताएंगे, अशी टीका शिवसेना केंद्रात सत्तेत असतानाही राऊत करीत असत. आता मोदीजींनी राममंदिराच्या भूमीपूजनाची तारीख सांगितली असल्याने आता राऊत तुम्ही अयोध्येत पाया पडायला कधी जाता, असा सवालही शेट्टी यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल व राज्यातील कोरोनाचा फैलाव कमी होण्यास मदत होईल, अशी टोमणाही शेट्टी यांनी मारला आहे. 

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख