आणखी एक धडाकेबाज पोलिस अधिकारी शिवसेनेत; नवी मुंबईतून लढणार  - Another aggressive police officer joins Shiv Sena; Will fight from Navi Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

आणखी एक धडाकेबाज पोलिस अधिकारी शिवसेनेत; नवी मुंबईतून लढणार 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 24 जानेवारी 2021

नवी मुंबईत केलेल्या विविध कारवाईमुळे त्यांचा गुन्हेगारी जगतात दबदबा होता.

नवी मुंबई : गुन्हेगारी जगतातील भल्याभल्यांना घाम फोडणारे धडाकेबाज माजी पोलिस अधिकारी दिलीप जगताप यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या तिकिटावर ते पावणे गावातून निवडणूक लढवणार आहेत. जगताप यांच्यासारखा सुशिक्षित आणि प्रशासकीय चेहरा शिवसेनेच्या गोटात सहभागी झाल्यामुळे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे पारडे जड झाले आहे. 

दरम्यान, एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यानंतर शिवसेनेते सामील झालेले जगताप हे दुसरे वरिष्ठ पोलिस अधिकारी आहेत. शर्मा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला होता. नालासोपरामधून शिवसेनेने त्यांना क्षितीज ठाकर यांच्या विरोधात विधानसभेचे तिकिट दिले होते. मात्र, त्या निवडणुकीत शर्मा यांचा पराभव झाला होता. आता जगताप हे नवी मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरणार आहेत, त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या इनिंगकडे पोलिस वर्तुळाचे लक्ष असणार आहे. 

मूळचे बारामती तालुक्‍यातील दिलीप जगताप हे नवी मुंबईत 2010 ते 2013 च्या काळात सहायक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. नवी मुंबईत केलेल्या विविध कारवाईमुळे त्यांचा गुन्हेगारी जगतात दबदबा होता. मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांनाच आपलेसे वाटायचे. सेवानिवृत्त झाल्यानंतरचे आपले आयुष्य जनसेवेत घालवण्यासाठी त्यांनी समाजकारणाला प्राधान्य दिले. 

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या माध्यमातून जगताप यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. तुर्भेतील गाजलेले माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या सहकार्याने ते पावणे गावातील जागेवर शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहेत. जगताप यांच्यासारखा कर्तबगार आणि स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी महाविकास आघाडीतून लढणार असल्याने आत्तापासूनच विजयाचा मार्ग सुकर समजला जात आहे. 

ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते जगताप यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन झाले. या कार्यालयाच्या माध्यामातून पावणे गावातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन समस्या सोडवल्या जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. गावातील प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यास कटीबद्ध असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख