'गड्या आपुला गाव बरा' म्हणत ते गावी रवाना..  

घाटकोपर खंडोबा टेकडी डोंगराळ भागातील सुमारे 13 हजार घाटकोपरवासी आपापल्या गावी गेले आहेत.
migrant worker1
migrant worker1

घाटकोपर : डोंगराळ भाग.. त्यात दाटीवाटीने वसलेल्या असंख्य झोपड्या... दहा बाय दहाच्या घरात 6 ते 7 जणांचे कुटुंब... 250 ते 300 झोपड्यांसाठी 10 आसनी शौचालय... त्यात कोरोना विषाणूचा शिरकाव. या भीतीने घाटकोपर खंडोबा टेकडी डोंगराळ भागातील सुमारे 13 हजार घाटकोपरवासी आपापल्या गावी गेले आहेत. 

महाड, माणगाव, पोलादपूर, खेड, दापोली, रत्नागिरी, अलिबागमधील अनेक कोकणपट्ट्यातील नागरिक घाटकोपर पूर्व आणि पश्‍चिमेकडील डोंगराळ भागात राहतात. जगभरात कोरोनाचे थैमान आणि मुंबईत सतत वाढत असणारा कोरोनाबाधितांचा आकडा पाहून नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेला लॉकडाउन अद्यापही सुरू आहे. झोपड्यात कोरोनाने शिरकाव केल्याने सार्वजनिक शौचालयामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.

लॉकडाउन त्यात झोपड्यांतही कोरोना रुग्ण सापडत असल्याने 'दहा बाय दहा'च्या खोल्यांमध्ये प्रत्येक कुटुंबाला स्वतःला क्वांरटाइन करून घेणे अवघड जात आहे. त्यात सार्वजनिक शौचालयाचा वापर सामान्य तसेच कोरोनाबाधित कुटुंबीयांना एकत्रित करावा लागत असल्याने नागरिकांच्या मनात भीती आहे. मुंबईच्या या रहाटगाड्यात जीव मुठीत धरून राहावे लागत असल्याने अनेक जण "गड्या आपला गावच बरा' म्हणत कोकणात गेले आहेत.

कोरोनाच्या भीतीने अनेकजण आपला जीव धोक्‍यात घालून गावाच्या दिशेने निघाले आहेत. कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाल्याने लोकांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले आहेत. मात्र अशा परिस्थितीतही अनेकजण जीव धोक्‍यात घालून आपल्या मिळेल त्या वाहनांने आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत.
 

मातीची ओढ

लॉकडाउननंतर तब्बल 5 लाख 63 हजार स्थलांतरित राज्यात अडकले आहे. त्यातील काही जण आपल्या गावी रवाना होत आहे. आम्हाला घरी जावू द्या... अनामिक भीतीने त्यांना ग्रासले असून आपल्या कुटुंबाबरोबर राहण्याची त्यांना ओढ लागली आहे. आपण रुग्ण नाही... कोरोनाग्रस्त नाही, याची पूर्ण खात्री झालेल्या कामगारांना आता त्यांच्या मातीची ओढ लागली आहे. ते काहीही ऐकायला तयार नाहीत. महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी मजुरांची ही अस्वस्थता लक्षात आणून दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांनी या माहितीची दखल घेतली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com