उपमुख्यमंत्रीच काय मुख्यमंत्रीपदाचाही दावा करता येईल ! - Why dy CM, They can claim for CM Post Also. Chhagan Bhujbal Politics | Politics Marathi News - Sarkarnama

उपमुख्यमंत्रीच काय मुख्यमंत्रीपदाचाही दावा करता येईल !

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

दावा तर मुख्यमंत्रीपदासाठीदेखील करता येऊ शकतो; परंतु प्रत्‍यक्षात काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत पक्षश्रेष्ठी ठरवतील तोच अंतिम निर्णय असेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्‍येष्ठ नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्‍यक्‍त केली.

नाशिक : दावा तर मुख्यमंत्रीपदासाठीदेखील करता येऊ शकतो; परंतु प्रत्‍यक्षात काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत पक्षश्रेष्ठी ठरवतील तोच अंतिम निर्णय असेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्‍येष्ठ नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्‍यक्‍त केली. 

जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष कोणाला प्रदेशाध्यक्ष करते किंवा कोणाला कुठले पद देते हा सर्वस्‍वी काँग्रेस पक्षाचा विषय आहे. इंधन दरवाढ व त्‍याविरोधात सुरू असलेल्‍या भाजपच्‍या आंदोलनाबाबत प्रश्‍नावर श्री. भुजबळ म्‍हणाले, की लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्‍येक नागरिकाचा अधिकार आहे; परंतु राज्‍य शासनाच्‍या तुलनेत केंद्र सरकारकडून इंधनावर जादा प्रमाणात कर आकारला जातो. त्‍यात कपात करून केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा द्यावा. 

जिल्‍हा बँकेने सामंजस्‍याने घ्यावे 
थकीत कर्जप्रकरण नोटीस बजावल्‍यानंतर शेतकऱ्याने आत्‍महत्‍या केल्‍याच्‍या घटनेविषयी ते म्‍हणाले, की जिल्‍हा बँकेने सामंजस्‍याने परिस्‍थिती हाताळायला हवी. यापूर्वीच कोरोनाकाळात शेतकऱ्याच्या उत्‍पन्नावर परिणाम झालेला आहे. त्‍यातच नोटिसा व अन्‍य बाबींतून दडपण आणायला नको. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. 

...तर सेलिब्रिटीज‌नी शेतकऱ्यांसोबत उभे राहावे 
दिल्‍लीभोवती आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्‍तानातून आलेले नसून, ते भारतीय नागरिकच आहेत. आता आंतरराष्ट्रीय कलावंतांकडून शेतकऱ्यांची बाजू घेतली जात असल्‍याने हे आंदोलन जागतिक स्‍तरावर पोचले आहे. आता एकात्‍मतेचा संदेश देण्यासाठी सेलिब्रिटीज‌नी आपली नेमकी भूमिका जाहीर करावी. ते शेतकऱ्यांच्‍या पाठीमागे उभे राहिले तर अन्‍य देशांतील कलावंतांना पुढाकार घेण्याची आवश्‍यकता भासणार नाही.  
...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख