कृषी कायदे रद्द केले तर काय बिघडणार आहे? - What happen if Agreeculture bills take back. Chhagan BHujbal Politics. | Politics Marathi News - Sarkarnama

कृषी कायदे रद्द केले तर काय बिघडणार आहे?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. अत्यंत प्रतिकुल स्थितीत तो कष्ट करुन अन्नधान्य पिकवतो. त्याच्या कष्टाचे मोल कधी विचारात घेणार आहात की नाही. हा शेतकरी आंदोलन करतो आहे. या अन्नदात्याला न्याय का नाही?.

नाशिक : शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. अत्यंत प्रतिकुल स्थितीत तो कष्ट करुन अन्नधान्य पिकवतो. त्याच्या कष्टाचे मोल कधी विचारात घेणार आहात की नाही. हा शेतकरी आंदोलन करतो आहे. या अन्नदात्याला न्याय का नाही?. कृषी कायदे रद्द केले तर काय बिघडणार आहे? असा प्रश्न राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. 

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबार कार्यक्रमा वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी कायमच उभे राहणार आहे. शेतकरी महिनोंमहिने कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत बसले आहेत. जवळपास शंभर शेतक-यांचा या आंदोलनादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याची दखल का घेतली जात नाही.   लोक मरत आहेत परंतु पंतप्रधान ठोस निर्णय घेत नाहीत. काय बिघडणार आहे, शेतकऱ्यांना न्याय दिला तर कृषी कायदे रद्द केले तर काय बिघडेल असा रोखठोक सवाल भुजबळ यांनी केला. 

ते पुढे म्हणाले, दिल्लीच्या सीमांवर शेतकरी हे आपल्या बायका - पोरं घेऊन थंडी वार्‍यात, कोरोना असताना आंदोलनाला बसले आहेत. त्यांना कोण खलिस्तानी तर कोण पाकिस्तानी म्हणून हिनवल जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार नेमके काय करतंय? असा संतप्त सवालही त्यांनी केला. केंद्र सरकारचे हे कायदे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरतील असे मत देखील  भुजबळ यांनी व्यक्त केले.

जे तुमच्या आमच्यासाठी अन्न पिकवतात त्यांचा विचार करत नसाल तर काय संदेश जाईल असे श्री. भुजबळ म्हणाले. ते म्हणाले, या देशात अन्नधान्याचा दुष्काळ होता त्यावेळी या शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवलं आणि परदेशातही निर्यात केलं. त्या शेतकऱ्यांना दोन - चार दिवस ठिक आहे. महिनोंमहिने आंदोलन करावे लागते आहे. पंतप्रधान मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. कृषी कायदे रद्द करा. मागे घ्या. नवीन कायदा बनवायचा असेल तर नवीन बनवा आणि शेतकर्‍यांबरोबर चर्चा करा असा सल्लाही छगन भुजबळ यांनी दिला आहे.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख