नाशिक : निवृत्त सरन्यायाधीश तरुण गोगोई हे भाजप नियुक्त राज्यसभा सदस्य आहेत. त्यांनी न्यायालयात न्याय मिळत नाही असे वक्तव्य करणे अतिशय बोलके आहे. मात्र त्यांना ही उपरती त्यांचा कार्यकाळ संपल्यावर झाली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील एखादे उदाहरण देखील देशापुढे आणले असते तर बरे झाले असते, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
निवृत्त सरन्यायाधीश गोगोई यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात न्यायालयात न्याय मिळत नाही. त्यामुळे न्यायालयात जात नाही. श्रीमंतांना न्याय मिळणे सोपे होते असे विधान केले होते. या विधानावरुन चांगलीच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात खासदार राऊत यांना प्रश्न केला असता, त्यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले, न्यायालयावर विश्वासच राहिला नाही या विधानाकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. न्यायदेवतेवर टिका करु नये, हे आम्ही मान्य करीत आलो आहोत. यादृष्टीने लक्षात घेतले पाहिजे, की गोगोई हे भाजपनियुक्त राज्यसभा सदस्य आहेत. हा संदर्भ जरुर विचारात घेतला पाहिजे. गोगोई यांनी जे विधान केले, त्याची उपरती त्यांना त्यांचा कार्यकाळ संपल्यावर का झाली?. हे करताना त्यांनी आपल्या कारकिर्दीतील एखादे उदाहरण देशासमोर आणले असते तर जास्त बरे झाले असते.
श्री. गोगोई हे एव्हढी वर्षे देशाच्या महत्वाच्या पदांवर काम केले आहे. विविध न्यायालयीन संस्था, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात त्यांनी काम केले आहे. त्यांच्याकडून न्यायालयांबाबत अशी अपेक्षा करता येत नाही. सध्या ते पदावरुन पायउतार झाले आहेत. पदावरुन गेल्यावर त्यांना हा साक्षात्कार का झाला? हा चिंतेचा विषय आहे, असेही राऊत म्हणाले.
भाजप कसा मोठा झाला?
"आंदोलनजीवी' या पंतप्रधानांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. खासदार राऊत म्हणाले, जनतेला त्रस्त करणारे विषय आहेत. सामान्यांना जगणे कठीण झाले. बेरोजगारी वाढली. नोकऱ्या मिळत नाही. पेट्रोलचा दर शंभर रुपये लिटर झाला, अशावेळी जनतेने आंदोलन करायचे नाही तर घरी बसुन रहायचे काय?. आपल्याकडे लोकशाही आहे. आंदोलने तर लोकशाहीतच होतातच, मात्र हुुकमशाही व लष्करशाही असलेल्या देशांतही होत आहेत.
आपल्या शेजारच्या म्यानमारमध्ये लष्करशाही आहे मात्र तेथे जनता रस्त्यावर उतरलेली आहे. पाकिस्तानात लोक आंदोलन करीत आहेत. रशीयात पुतीन यांच्या विरोधात क्रेमलीन चौकात लोक जमतात. त्यामुळे ते त्रस्त आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पायउतार झाल्यावर त्यांच्या लाखो समर्थकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. भारतीय जनता पक्ष मात्र जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर ढोंग करतो आहे. केंद्र सरकारने जनतेचा आवाज ऐकला पाहिजे. मात्र ते शेतकरी आंदलनाची थट्टा करीत आहेत. शेतकऱ्यांचा आवाज ऐकायचाच नाही असे त्यांनी ठरवले आहे. या आंदोलनाचा ते तिरस्कार करीत आहेत. हे करताना भाजपचा जन्म देखील आंदोलनातूनच झाला आहे, हे ते विसरले आहेत. उद्या सत्तेतून गेल्यावर त्यांनाही आंदोलनासाठी रस्त्यावरच यावे लागेल हे त्यांनी लक्षात घ्यावे.
....

