रूपं बदलणारा विषाणू, गुन्हेगारीशी लढण्याचे पोलीसांचे शौर्य 

महाराष्ट्र पोलीस दलाला कर्तव्यदक्षतेचा समृद्ध वारसा आणि इतिहास लाभला आहे. आजच्या कोरोना संकटातही पोलीसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेत कुठलीही तडजोड केलेली नाही. पदोपदी रूपं बदलणारा कोरोनाचा विषाणू आणि त्याच गतीने क्षणोक्षणी स्वरूप बदलणारी गुन्हेगारी ही पोलीसांसमोरची मोठी आव्हाने आहेत
uDDHAV tHAKRE
uDDHAV tHAKRE

नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलाला कर्तव्यदक्षतेचा समृद्ध वारसा आणि इतिहास लाभला आहे. आजच्या कोरोना संकटातही पोलीसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेत कुठलीही तडजोड केलेली नाही. पदोपदी रूपं बदलणारा कोरोनाचा विषाणू आणि त्याच गतीने क्षणोक्षणी स्वरूप बदलणारी गुन्हेगारी ही पोलीसांसमोरची मोठी आव्हाने आहेत. या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी पोलिसांनी दाखवलेले धैर्य व शौर्य गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 118 व्या तुकडीचे दीक्षांत संचलन आज झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे प्रशिक्षणार्थींना संबोधित केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार दूरदृश्‍य प्रणालीद्वारे सहभागी झाले. श्री. ठाकरे म्हणाले, कर्तव्यदक्ष व धैर्यवान पोलिसांची दीर्घ परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. अशा पोलिस दलात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलीसांचे मी अभिनंदन करतो. आज पोलीस दलासमोर दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या शत्रुंचे मोठे आव्हान आहे. एकीकडे आमचे पोलिस गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी लढत आहेत. दुसरीकडे हेच पोलिस कोरोना संकटाचा सामना निकराने करताना दिसतात. दिसणाऱ्या शत्रूवर आपण तुटून पडतो पण आज न दिसणाऱ्या कोरोनासारख्या शत्रुशीही पोलिस जिवाची बाजी लावून लढत आहेत. याबद्दल पोलिसांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, प्रसंगावधानता हा अत्यंत महत्वाचा गुण पोलीसांच्या अंगी आवश्‍यक असतो. कधीकधी एखादी कारवाई केली तर का केली? म्हणून प्रश्न उपस्थित केले जातात तर नाही केली तरी का नाही केली? याद्दबद्दलही प्रश्न उपस्थित केले जातात. अशा वेळी "होश आणि जोश" यांचे तारतम्य ठेवून निर्णय घ्यायचे असतात. माणसाची इच्छाशक्ती हा अत्यंत महत्वाचा गुण असतो. ही इच्छाशक्तीच आपली स्वप्न निश्‍चित करत असते. आज अकादमीतून बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी पोलिस दलात जायचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं ही जीवनातली फार मोठी उपलब्धी आहे. अशी स्वप्न पहाययला मोठी दुर्दम्य इच्छाशक्ती लागते. ती पोलिस दलात येणाऱ्या प्रत्येकाच्या ठायी असते. भविष्यात तुमची स्वप्न ही केवळ तुमची स्वप्न नाहीत तर ती संपूर्ण महाराष्ट्राची स्वप्न आहेत. हे सर्व प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी पोलिस महासंचालक रजनीश शेठ, अपर पोलिस महासंचालक संजयकुमार, नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दीघावकर, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, उपसंचालक (प्रशिक्षण) गौरव सिंग, उपसंचालक (प्रशासन) शिरीष सरदेशपांडे, उपसंचालक काकासाहेब डोळे, सहा. संचालक अभिजीत पाटील उपस्थित होते. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com