शीतयुद्ध नव्हे...राज्यपालांशी आमचे खुले वॉर  - Not Cold War...we are in clear war with Governer. Shivsena Politics | Politics Marathi News - Sarkarnama

शीतयुद्ध नव्हे...राज्यपालांशी आमचे खुले वॉर 

संपत देवगिरे
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

मंत्रीमंडळाचे निर्णय स्विकारणे हे राज्यापालांना बंधनकारक असते. मात्र सध्या राजभवनचा वापर राजकीय कारणासाठी होत आहे. राज्यपालांच्या आडून भारतीय जनता पक्ष आपले राजकारण पुढे रेटीत आहे. त्यामुळे आमचे राज्यपालांशी शीतयुद्ध नव्हे तर खुले वॉर आहे.

नाशिक : मंत्रीमंडळाचे निर्णय स्विकारणे हे राज्यापालांना बंधनकारक असते. मात्र सध्या राजभवनचा वापर राजकीय कारणासाठी होत आहे. राज्यपालांच्या आडून भारतीय जनता पक्ष आपले राजकारण पुढे रेटीत आहे. त्यामुळे आमचे राज्यपालांशी शीतयुद्ध नव्हे तर खुले वॉर आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले. 

राज्यपालांच्या विमान उपलब्धतेबाबत सुरु असलेल्या वादासंदर्भात "राज्यपालांशी आपले शीतयुद्ध सुरु आहे का?' असा प्रश्‍न केला असता, खासदार राऊत म्हणाले, आमचे हे शीतयुद्ध आहे असे म्हणून नका. आमचे हे खुले वॉर आहे. राज्यपालांच्या आडून भारतीय जनता पक्ष राजकीय युद्ध करीत आहेत. ते आपला अजेंडा राबवीत आहेत. राज्य सरकारचे अनेक महत्वाचे निर्णय राज्यपालांच्या निर्णयाअभावी अडकून पडले आहेत. त्याला कोण जबाबदार आहे?. बारा विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णय होत नाही. का होत नाही? हे कोणी विचारणार की नाही?. त्यावर राज्यपालांकडून निर्णय का होत नाही. हे सर्व आमदार सहा वर्षांनी निवृत्त होणार हे ठरलेले आहे. मात्र त्यांची नियुक्ती लांबली आहे. राज्यपालांकडून त्यांच्या नियुक्तीला विलंब होत आहे, त्याचे काय?. हा संवेदनशील विषय आहे. मंत्रीमंडळाच्या शिफारशी स्विकारणे राज्यपालांवर बंधनकारक आहे. तरीही असे होते आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेची पायमल्ली होत आहे. 

खासदार राऊत म्हणाले, युद्धात अनेक औजारे वापरली जातात. तंत्र वापरले जाते. त्यामुळे या युद्धात कोणती औजारे वापरणार यावर आम्ही काहीही बोलणार नाही. मात्र राजभवनचा राजकीय कारणासाठी वापर होतो आहे, हे लपुन राहिलेले नाही. असे होता कामा नये. ते थांबले पाहिजे. राज्यपाल राजकीय दबावाखाली काम करीत आहेत. हे थांबावे ही अपेक्षा आहे. 

मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास 
गेले एक दोन वर्षे राजकीय नेते, मंत्र्यांवर वैयक्तीक आरोप, नींदा- नालस्ती, चारित्र्यहनन करुन नेत्यांचे राजकीय भविष्य अडचणीत येईल असे प्रयत्न राजकीय हेतूने होत आहेत. विरोधी पक्षाने कामकाजाची ती दिशा ठरवली आहे. परंतु महाराष्ट्र हे कायद्याच राज्य आहे, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे विषय किती गंभीर आहेत, होणाऱ्या आरोपांबाबत काय निर्णय करायचा हे राज्य सरकार ठरवील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय संयमी व्यक्ती आहेत. त्यांच्यावर सगळ्यांचा विश्‍वास आहे. त्यामुळे मंत्रीमंडळातील सहकारी संजय राठोड यांच्या विषयीच्या आरोपांबाबत ते निश्‍चित चौकशी करतील. श्री. राठोड हे प्रदिर्घकाळ समाजकारण, राजकारणात सक्रीय आहेत. ते त्यांच्या समाजाचे मोठे नेते आहेत. हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. 
... 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख