वर्षा निवासस्थानी आज नाशिकच्या निवडणुकीची खलबते

निवडणुकीची रणनीती आखण्याबरोबरच नगरसेवकांनी केलेली वप्रस्तावित कामे, कुठल्या मुद्यावर निवडणूक लढवायची, याविषयांवर शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नगरसेवकांची बैठक आज सायंकाळी होत आहे.
Uddhav Thakre
Uddhav Thakre

नाशिक : पुढील वर्षाच्या सुरवातीला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून, या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीची रणनीती आखण्याबरोबरच चार वर्षांत नगरसेवकांनी केलेली कामे, भविष्यातील प्रस्तावित कामे व कुठल्या मुद्यावर निवडणूक लढवायची, याविषयांवर शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक आज सायंकाळी होत आहे. 

महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत संधी असूनही शिवसेनेला नाशिककरांनी सत्तेपासून दूर ठेवले. भारतीय जनता पक्षाला बहुमत देताना निम्मे नगरसेवक शिवसेनेचे निवडून प्रबळ विरोधी पक्ष दिला होता. शिवसेनेला संधी असूनही सत्ता न मिळाल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले होते. त्याचवेळी निवडणुकीतील चुका शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. गेल्या चार वर्षांत निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता, वर्षभरापूर्वीच निवडणुकीची तयारी करण्याचे नियोजन केले आहे. एकीकडे भाजपकडून विकासकामांचे नारळ फोडण्याची तयारी होत आहे, तर दुसरीकडे भाजपच्या कामांचा पर्दाफाश करण्याबरोबरच आगामी निवडणुकीत सक्षम पक्ष म्हणून शिवसेनेला मतदारांसमोर आणण्याच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने व शिवसेना त्यात प्रमुख घटक असल्याने त्याचा लाभ मतदानाच्या रूपाने पदरात पाडून घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे बैठक होत आहे. खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, गटनेता विलास शिंदे, वसंत गिते, सुनील बागूल, दत्ता गायकवाड, सत्यभामा गाडेकर आदींसह नगरसेवक बैठकीत सहभागी होतील.

याविषयांवर होणार चर्चा
२०१९ मध्ये शासनाने एकसदस्यीय प्रभाग रचनेचा कायदा केला असला, तरी ५० टक्के महिला आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर द्विसदस्यीय प्रभाग रचनेचा नगरसेवकांचा आग्रह आहे. बैठकीत याविषयावर चर्चा होईल. चार वर्षांत सत्ताधारी भाजपकडून झालेल्या चुका प्रकर्षणाने मतदारासंमोर मांडणे, राज्यातील सत्तेच्या माध्यमातून महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच रिक्त पदे भरणे, महापालिकेसाठी निधी देणे आदी विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

..

खासदार संजय राऊत यांच्याकडे नाशिकमधील प्रश्‍नासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार ही बैठक होत आहे.
- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, महापालिका
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com