निवडणुकांना स्थगितीने भाजप, शिवसेनेच्या मनसुब्यांवर पाणी - Municiple corporation elections postpone due to Corona, State Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

निवडणुकांना स्थगितीने भाजप, शिवसेनेच्या मनसुब्यांवर पाणी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली होती. त्याची यंदाही पुनरावृत्ती झाली आहे. कोरोनामुळे यंदा या निवडणुका एक महिना लांबणीवर पडल्या आहेत.

नाशिक : गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली होती. त्याची यंदाही पुनरावृत्ती झाली आहे. कोरोनामुळे यंदा या निवडणुका एक महिना लांबणीवर पडल्या आहेत. नगरविकास विभागाने हा आदेश काढला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजांना प्रभाग समिती सभापतीपदाच्या बोहल्यावर चढवून खूश करण्याचा सत्ताधारी भाजपाचा प्रयत्न फसण्याची शक्यता आहे. 

या निर्णयाने केवळ सही चुकल्यामुळे शहर सुधार व आरोग्य व वैद्यकीय समिती सभापतीपदापासून भाजपच्या नगरसेवकाला केवळ सही चुकल्याने वंचित राहावे लागणार आहे. महापालिकेतील सध्याच्या नगरसेवकांच्या कार्यकाळातील हे अखेरचे वर्ष असल्यामुळे प्रभाग समिती तसेच विषय समिती निवडणुका सत्ताधारी भाजपासाठी महत्त्वाच्या होत्या.

महापालिका क्षेत्रात पंचवटी, सातपूर, नवीन नाशिक, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम व नाशिक रोड असे सहा प्रशासकीय विभाग आहे. प्रत्येक विभागासाठी एक सभापती नियुक्त केला जातो. यातील दोन समित्यांवर भाजपाचे वर्चस्व आहे. मनसेच्या मदतीने अन्य दोन समित्या खेचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 

दरम्यान, वर्षभरासाठी प्रभाग समिती सभापतीपदाची नियुक्ती असते. मार्च महिन्यात मुदत संपल्यानंतर तात्काळ महापालिका आयुक्त हे विभागीय आयुक्तांकडे निवडणूक कार्यक्रमाची मागणी करतात. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुढील वर्षभरासाठी सभापती निवड होणे अपेक्षित आहे. गतवर्षी, २२ मार्चनंतर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॅाकडाउन झाल्यानंतर सभापती निवडणुकीची प्रक्रिया रखडली. राज्याच्या नगरविकास विभागाने कोणत्याही सभेसाठी पाच पेक्षा अधिक सदस्यांना एकत्र बोलवता येऊ शकत नाही, असे कारण देत स्थगिती दिली. ही स्थगिती सप्टेंबर २०२० च्या सुमारास हटवली गेल्यानंतर १५ ऑक्टोबर २०२० रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहाही प्रभाग सभापतीपदांसाठी निवडणुका घेण्यात आल्या. त्यानुसार पंचवटी प्रभाग सभापतीपदी भाजपच्या शीतल माळोदे, पश्चिम सभापतीपदी मनसेच्या ॲड. वैशाली भोसले, नवीन नाशिक सभापतीपदी शिवसेनेचे चंद्रकांत खाडे, सातपूर सभापतीपदी भाजपचे रविंद्र धिवरे, नाशिकरोड सभापतीपदी शिवसेनेच्या जयश्री खर्जुल तर, नाशिक पूर्व प्रभाग समितीच्या सभापतीपदी भाजपचे ॲड. श्याम बडोदे यांची निवड झाली. 

या पदाधिका-यांनी जेमतेम साडे पाच महिन्यांचा कार्यकाळ भुषवल्यानंतर त्यांना ३१ मार्चला कार्यकाळ संपल्यामुळे पायउतार व्हावे लागले. पंचवार्षिक कार्यकाळातील अखेरचे वर्षा असल्यामुळे किमान पक्षातील नाराजांना पुढील वर्षभरासाठी प्रभाग समिती सभापती करण्यासाठी सत्ताधारी भाजप तसेच शिवसेनेची धडपड सुरू होती. त्यामुळे सहाही प्रभाग समित्यांसाठी नव्याने निवडणुक घेण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे २३ मार्चला पाठवण्यात आला होता. सर्वसाधारणपणे प्रस्ताव गेल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये त्यास मंजुरी मिळते.  मात्र कोरोनामुळे ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. 

शुक्रवारी नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या स्थायी समिती व विषय समित्यांच्या सभापती सदस्यांच्या निवडणुका स्थगित करण्याबाबत पत्र सर्व विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी यांना पाठवले आहे.

एक महिन्यानंतर फेरआढावा
या पत्रात म्हटले आहे की, सद्यस्थितीत राज्यात कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत असून वाढती रुग्णसंख्या, आरोग्य सुविधांवर असणारा ताण, संक्रमणात होत असणारी वाढ यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेता महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत समितीमधील विषय समिती, स्थायी समिती सभापती व सदस्य निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. राज्यातील कोरोना संक्रमण परिस्थितीचा आढावा एक महिन्यानंतर घेऊन वस्तुस्थिती व तपशिलाच्या आधारावर निवडणुकांबाबत निर्णय घेतला जाईल असेही म्हटले आहे.
...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख