धनंजय मुंढेंनी केले झीरो पेंडन्सी उपक्रमाचे कौतुक - Minister Mundhe appriciate zero pendancy...Mundhe politics | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंढेंनी केले झीरो पेंडन्सी उपक्रमाचे कौतुक

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 जानेवारी 2021

"राज्याच्या समाजकल्याण विभागात आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सुरू केलेल्या ‘झीरो पेंडन्सी’ आणि ‘डेली डिस्पोजल’ यासारख्या प्रशासकीय सुधारणा स्पृहणीय आहेत. त्याने विद्यार्थी व नागिरकांना दिलासा मिळेल.

नाशिक : "राज्याच्या समाजकल्याण विभागात आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सुरू केलेल्या ‘झीरो पेंडन्सी’ आणि ‘डेली डिस्पोजल’ यासारख्या प्रशासकीय सुधारणा स्पृहणीय आहेत. त्याने विद्यार्थी व नागिरकांना दिलासा मिळेल" असे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. 

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य समाज कल्याण कर्मचारी संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. कर्मचारी तसेच प्रशासनाच्या विविध प्रश्नांबाबत विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक झाली. बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे,  समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांसह विविध पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी श्री. मुंडे म्हणाले की, कर्मचारी संघटनेच्या रास्त मागण्या निश्चितपणे मान्य करण्यात येतील, परंतू कामाच्या कार्यक्षमतेबाबत कोणतिही तडजोड केली जाणार नाही. सामाजिक न्याय विभागामध्ये शिस्तीने होणारे काम कौतुकास्पद आहे. जनतेप्रती प्रशासनात संवेदनशीलता निर्माण करणे, उत्तरदायीत्वाची भावना निर्माण करून प्रशासन अधिक जलद करणे यासाठी समाज कल्याण आयुक्तांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणांचा निश्चितच फायदा होणार आहे. मंत्री म्हणून मी या सुधारणांच्या पाठीशी आहे.

ते पुढे म्हणाले, रिक्त पदे, कामाचा बोजा हा सर्वच विभागांमध्ये आहे. त्यामुळे ज्यावेळेस पदे  भरण्यासाठी शासनाचे निर्बंध उठविण्यात येतील त्यावेळेस पदभरतीबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल. विविध स्तरावरच्या पदोन्नती, प्रशिक्षण, विभागीय परीक्षांबाबत नजीकच्या कालावधीत प्रलंबित कामे पुर्णत्वास नेऊ.

आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यावेळी म्हणाले, कार्यालय अधीक्षक, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक व सहायक लेखाधिकारी ही चार पदे महत्वाची आहेत. या पदांच्या जबाबदारीमध्ये वाढ करणे, त्यांच्या सन्मानामध्ये वाढ करणे, त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे यासाठी एक प्रशासकीय प्रणाली तयार करण्यात येत आहे.

दरम्यान या बैठकीनंतर समाज कल्याण कर्मचारी संघटनेने पुकारलेले लेखणीबंद आंदोलन या सकारात्मक चर्चे अंती मागे घेण्यात आले.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख