माजी मंत्री एकनाथ खडसेंना हायकोर्टाचा दिलासा  - High Court orders not to take action against Eknath Khadse till next 17th | Politics Marathi News - Sarkarnama

माजी मंत्री एकनाथ खडसेंना हायकोर्टाचा दिलासा 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

तपास सुरू असताना अशी याचिका अयोग्य आहे, असा दावा केला आहे. 

मुंबई : पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणात आज (ता. 4 फेब्रुवारी) मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना दिलासा दिला. येत्या 17 तारखेपर्यंत ईडीने (सक्तवसुली संचालनालय) खडसे यांच्याविरोधात कठोर कारवाई करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले. 

पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड गैरव्यवहाराबाबत ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी अटक होण्याच्या शक्‍यतेमुळे भारतीय जनता पक्षामधून नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेले खडसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. याचिकेच्या पुढील सुनावणीपर्यंत (ता. 17 फेब्रुवारी) खडसे यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करण्यात येऊ नाही, असे अंतरिम निर्देश न्यायालयाने ईडीला दिले. या याचिकेवर 17 तारखेला सुनावणी होणार आहे. 

ईडीने राजकीय आकसापोटी तपास सुरू केला आहे. त्यामुळे ही फिर्याद रद्द करावी, अशी मागणी खडसे यांनी याचिकेत केली होती. चौकशीची व्हिडीओ शुटिंगही करण्यात यावी, अशीही मागणी केली आहे. त्यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र, कोरोनाबाधित झाल्यामुळे त्यांनी उपचारानंतर चौकशीला हजेरी लावली होती. ईडीने याचिकेला प्रतिज्ञापत्राद्वारे विरोध केला आहे. तपास सुरू असताना अशी याचिका अयोग्य आहे, असा दावा केला आहे. 

हेही वाचा : तुम्हाला पुन्हा येईन, पुन्हा येईनच करत बसावे लागेल! 

जळगाव : महाराष्ट्रात महाविकास आघाडी पाय रोवत आहे. यापुढे ती अधिक मजबूत होईल. विरोधकांना कितीही वाटत असेल की हे सरकार पडेल, पण तसे काहीही होणार नाही. हे सरकार टिकणार आहे, व्यवस्थितपणे चालणार आहे, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या महाविकास आघाडी सरकारची पाच वर्षे असेच निघून जातील. त्यांना "पुन्हा येईन, पुन्हा येईन' करतच रहावे लागेल, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे 11 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारी बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना खडसे बोलत होते. खडसेंनी यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा यशस्वी करण्याचे आवाहन केले 

कार्यकर्त्यांनी सोडून जाऊ नये म्हणून... 

एकनाथ खडसे यांनी यावेळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.खडसे म्हणाले, "आता राज्यातील राजकारण बदलत आहे. विरोधकांना कितीही वाटत असेल की हे सरकार पडेल, पण हे सरकार टिकणार आहे. कार्यकर्ते आपल्याला सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून हे सरकार पडणार आहे, आपण सत्तेत येणार आहोत, असे विरोधकांना सांगावे लागत आहे. त्यांना पुन्हा येईन, पुन्हा येईन करतच रहावे लागेल,'' यांच्या अहंमपणामुळे भाजपची राज्यातून सत्ता गेली. हे सर्वांना माहिती आहे, असा टोलाही खडसेंनी फडणवीस यांना लगावला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख