वा रे ठाकरे सरकार....केंद्राने दिलेली डाळही गरिबांपर्यंत पोचू दिली नाही  - BJP MLA Suresh Bhole criticizes Thackeray government over distribution of pulses | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

वा रे ठाकरे सरकार....केंद्राने दिलेली डाळही गरिबांपर्यंत पोचू दिली नाही 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

गरिबांच्या पोटावरसुध्दा राजकारण करणाऱ्या ठाकरे सरकारचा धिक्कार असो.

जळगाव  ः राज्यातील गोडाऊनमध्ये तूरडाळ सडल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागत सराकरचा निषेध केला आहे.

केंद्र सरकारने मागील वर्षीच्या लॉकडाऊनच्या वेळी गरिबांना वाटप करण्यासाठी तूरडाळ पाठवली होती. त्यातील शेकडो टन तूरडाळ ही वाटपाविना सडली आहे. एकट्या मुंबईत गोदामात सडलेल्या तूरडाळीचा आकडा हा सुमारे ५१५ टन असल्याचा आरोप भाजप नेते सुरेश भोळे यांनी केला आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांसाठी गहू, तांदूळ आणि तूरडाळ देण्याचे जाहीर केले होते. ह्याचे वाटप राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या अन्नधान्य वितरण विभागांतर्गंत रेशन दुकानांच्या माध्यमातून करण्यात येणार होते. गहू आणि तांदूळ राज्य सरकारने उपलब्ध करून दिले होते, तर केंद्र सरकारकडून आलेल्या तूरडाळीच्या निम्मी डाळ ही वाटपाअभावी खराब झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.  

मुंबई शहरातील १०० दुकानांना साडेतीन हजार टन डाळ वाटपासाठी दिली होती. मात्र, कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर डाळीचे वाटप दुकानदारांनी बंद केले. त्यामुळे ही तूरडाळ वाटपाअभावी सडून गेली आहे, असा आरोप भाजपचे मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांनी केला होता. याच मुद्यावरून आमदार भोळे यांनी ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत.

भाजप आमदार सुरेश भोळे यानी गेल्या कांही दिवसांपासून ठाकरे सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेचा भडिमार सुरू केला आहे. सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या विरोधात भूमिका घेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. 

लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये आमदार सुरेश भोळे म्हणतात की, वा रे ठाकरे सरकार, केंद्र सरकारने पाठवलेली लाखो टन डाळीची मदत ठाकरे सरकारने गोरगरीब जनतेपर्यंत पोचू दिली नाही. अनेक महिने ती गोडाऊनमध्ये ठेऊन कुजविली आणि एकीकडे शिवभोजन राबवित आहेत. गरिबांच्या पोटावरसुध्दा राजकारण करणाऱ्या ठाकरे सरकारचा धिक्कार असो.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख