मुंबई : एखाद्या समाजाचा आधार घेऊन आमच्या पाठीमागे समाज आहे, आम्ही काहीही करायचं? असं कसं चालेल. आम्हीही बीडचेच असून हे 2018 पासून चाललेले आहे, असं आम्ही ऐकतोय. बीडच नावही आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलं पाहिजे. कारण अगोदर एक प्रकरण आलं, तेसुद्धा बीड जिल्ह्याचच होतं. (तेवढ्यात खालून कोणीतरी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं.) आम्ही त्यांच्याबद्दल (धनंजय मुंडे) म्हणत नाही. धनंजय मुंडे साहेबांचं प्रकरण वेगळं आहे. त्याच्यावर आम्ही बोलणार नाही. हे आम्ही बीड जिल्ह्याचे म्हणून स्पष्टपणे सांगतो. कारण, ते प्रकरण आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यावर बोलणार नाही, असे सांगून भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेतील चर्चेदरम्यान धनंजय मुंडे यांचे प्रकरण उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरून विधान परिषद सदस्य धस यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच झोडपले. या प्रकरणात तुमच्या सरकारची काय... गेली, ते काय सांगावे. राज्यातील लहान मूलही त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज पूजा चव्हाण हिचाच असल्याचे सांगतं.
मी रमेश सिप्पी यांचा शोले चित्रपट पाहिला होता. त्यात गब्बर नावाचं पात्र होतं. तो गब्बरही शेवटी ठाकूरला सापडला. पण, राज्यातील हा गबरू कोण आहे? तो अजून कसा सापडेना. किती दिवस झाले हा गबरू सापडत नाही. नेमका असला कसला हा गबरू आहे आणि तो कोण गबरू आहे? गबरू, गबरूशेठ हे आम्ही फक्त क्लिपद्वारेच ऐकतो. याचं उत्तर आम्हाला मिळायलं पाहिजे, असे म्हणत त्यांनी माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला.
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाने काही नवीन पायंडे पाडले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील एका सन्मानीय सदस्याने आमुक आमुक आगे बढो म्हणून मोर्चा काढला. फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेता आणि कोणाला पाठिंबा देता? त्या मोर्चातील महिला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना शिव्या देत होत्या? एखाद्या समाजाचा आधार घेऊन आमच्या पाठीमागे समाज आहे. आम्ही काहीही करायचं? असं कसं चालेल, असा सवालही आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला.
मोर्चा काढून देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देणे, हे योग्य नाही. ज्या सन्मानीय सदस्याने हा मोर्चा काढला होता, त्यांनी हे नवीन पायंडे पाडल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार दिला पाहिजे. यामागची त्यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे. प्रसार माध्यमांतील वृत्तांकनाबद्दल नाराजी व्यक्त करत राज्यात यापुढे असे गबरूशेठ पुन्हा होऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

