लस घेतल्यास वंध्यत्व येईल, मृत्यू होण्याची भीती; गडचिरोलीत लसीकरण केंद्र ओस 

लसीकरणाबाबत गावांमध्ये अजिबात जनजागृती झालेली नाही.
Residents of Dhanora tehsil villages Gadchiroli hesitant to take COVID19 vaccines
Residents of Dhanora tehsil villages Gadchiroli hesitant to take COVID19 vaccines

गडचिरोली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. लस घेण्यासाठी नागरिकांच्या लसीकरण केंद्रांवर रांगा लागत आहेत. नागरिकांना पुढील काही दिवसांतील अपॅाईंटमेट मिळत नाहीत. लशींच्या वाढत्या मागणीमुळे तुटवडा निर्माण झाला आहे. देशाच्या अनेक भागात ही स्थिती असताना गडचिरोली जिल्ह्यात मात्र लसीकरणाबाबत अफवांचा संसर्ग वाढू लागला आहे. (Residents of Dhanora tehsil villages Gadchiroli hesitant to take COVID19 vaccines) 

जगभरात लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर अनेकांच्या मनात मोठी भीती होती. चाचण्यांचा कालावधी अत्यंत कमी असल्याने फ्रंटलाईन कर्मचारी लस घेण्यास घाबरत होते. रक्तात गुठळ्या होणे, मृत्यू ओढवण्याची भीती अनेकांना होती. पण लसीकरण वाढू लागल्यानंतर ही भीती संपली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी केंद्रांवर मोठ्या रांगा लागत आहे. त्यामुळे लशींचा तुटवडा जाणवू लागला आहे. 

पण गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील गावांमधील लोक लस घेण्यासाठी अजूनही घाबरत आहेत. लसीकरणाबाबत गावांमध्ये अजिबात जनजागृती झालेली नाही. त्यामुळं या गावातील ४५ वर्षांपुढील केवळ ४० जणांचे लसीकरण झाले आहे. इतरांना लस घेण्याची भीती वाटत आहे. लस घेतल्यास मृत्यू होईल, अशी भीती अनेकांच्या मनात आहे. तर १८ वर्षांपुढील तरूणांमध्ये लसीकरणाबाबत पुरेसे ज्ञान नसल्याचे दिसून आले आहे. लस घेतल्यानंतर वंध्यत्व येईल, आपण मुल जन्माला घालू शकणार नाही, अशी भीती पसरली असल्याचे लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना वेगळी लस

लसीकरण केंद्रातील कर्मचारी सदाशिव मंडावर यांनी सांगितले की, आम्ही नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करत आहोत. लस घेतल्यानंतर आमची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगत त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. पण फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना वेगळी लस दिल्याचे ते म्हणतात. इतर विभागांच्या मदतीने आम्ही गावात लसीकरणाबाबत जागृती करत आहोत. 

महाराष्ट्रात दोन कोटींचा टप्पा पार

देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे आहे.  महाराष्ट्राने दोन कोटी डोसचा टप्पा पार केला आहे. कालपर्यंत महाराष्ट्रात २ कोटी २ लाख ३१ हजार १८१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. १८ मे रोजी १ लाख २४ हजार ६६१ नागरिकांना लस देण्यात आली. लशींचा तुटवडा असल्याने राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. 

२ ते १८ वयोगटासाठी लवकरच लस

कोव्हॅक्सिनने २ ते १८ वयोगटासाठी लस विकसित केली आहे. या लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना औषध महानियंत्रकांनी नुकतीच परवानगी दिली आहे. पुढील १० ते १५ दिवसांत या चाचण्या सुरू होण्याची शक्यता आहे. नागपुरसह दिल्ली व अन्य शहरांमध्ये या चाचण्या होणार आहेत. त्यामुळे लहान मुलांसाठीही लवकरच लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com