धक्कादायक : योग्य उपचार मिळत नसल्याने पोलिसाचा आत्महत्येचा इशारा - Police Officer warned of suicide as he is not getting treatment | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : योग्य उपचार मिळत नसल्याने पोलिसाचा आत्महत्येचा इशारा

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

रुग्णांना बेड, अॅाक्सीजन, रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यात अडचणी येत आहेत.

हिंगोली : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने रुग्णालयांवरील ताण वाढला आहे. रुग्णांना बेड, अॅाक्सीजन, रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यात अडचणी येत आहेत. बेड मिळाला तरी योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. मनुष्यबळाअभावी आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला आहे. अशातच एका पोलिस कर्मचाऱ्याने योग्य उपचार मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचा इशारा पोलिस दलाला दिला आहे. 

हिंगोली येथे ही घटना घडली आहे. हिंगोली जिल्हा पोलिस दलातील पोलीस कर्मचारी सचिन इंगोले यांनी उपचार सुरू असलेल्या रुग्णालयावरून उडी घेत आत्महत्या करत असल्याचा अॅाडिओ मेसेज पोलिस अधिक्षकांना केला आहे. माननीय एसपी साहेब मी पोलीस कर्मचारी असताना मला रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याने मी रुग्णालयाच्या टेरेसवरून उडि घेत आत्महत्या करत आहे, असे इंगोले यांनी मेसेजमध्ये म्हटले आहे.

इंगोले यांच्या अॅाडिओ मेसेजमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सचिन इंगोले गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबीयांसोबत रुग्णालयात उपचार घेत आहेत. इंगोले यांना अस्थमा सह इतर आजारही आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

"शासकीय रुग्णालयातील डॉक्टर वारंवार विनंती करूनही लक्ष देत नाहीत. पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदतीची मागणी केली. त्यानंतरही मदत मिळाली नाही,'' अशी खदखद इंगोले यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच, जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी इंगोले यांच्यासह कुटुंबीयांना तातडीने मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान मोदीच सुपर स्प्रेडर!

देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला असून त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.केंद्र सरकार कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. संकटकाळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभा घेत राहिले. तर कोरोनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही केली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही आता टीका करण्यास सुरूवात केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॅा. नवज्योत दहिया यांनी थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान मोदी हेच सुपर स्प्रेडर असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट पसरण्यास तेच जबाबदार आहे. त्यांनी विधानसभेच्य निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये बेजबाबदारपणे प्रचार सभा घेतल्या. तसेच अशा संकटकाळात कुंभमेळा घेण्यासही परवानगी दिली, असा हल्लाबोल दहिया यांनी केला आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख