गांभीर्याने घेत नाही म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना नाना पटोलेंनी दिले हे उत्तर 

विरोधी पक्षांच्या सरकारवर टीका करणे, हा एककलमी कार्यक्रम भाजप नेत्यांनी हाती घेतला आहे.
Patole replied to Fadnavis who said that he did not take Nana Patole seriously
Patole replied to Fadnavis who said that he did not take Nana Patole seriously

मुंबई  ः कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना गांभीर्याने घेत नाही, म्हणणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पटोले यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की ‘संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन मुकाबला करणे अपेक्षित असताना आपले राजकीय दुकान चालू राहावे, यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. भाजपचा विकृत चेहरा आता जनतेसमोर आला असून जनताच आता त्यांना गांभीर्याने घेणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

नाना पटोले म्हणाले की, कोरोना महामारीच्या वर्षभराच्या काळात विरोधी पक्षांसह अनेक तज्ज्ञांनी केलेल्या सूचनांकडे मोदी सरकारने डोळेझाक करून आपले राजकीय अज्ञान उघड केले आहे. राज्यातील भाजप नेतेही कोणालाच गांभीर्याने घेत नाहीत, अशी विधाने करून या महामारीच्या काळात हीन राजकारण करत आहेत. केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी सतत विरोधी पक्षांच्या सरकारवर टीका करणे, हा एककलमी कार्यक्रम भाजप नेत्यांनी हाती घेतला आहे. संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन मुकाबला करणे अपेक्षित असताना आपले राजकीय दुकान चालू राहावे, यासाठी त्यांची धडपड सुरु असून भाजपचा विकृत चेहरा आता जनतेसमोर आला असून जनताच आता त्यांना गांभीर्याने घेणार नाही.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

कोरोनाच्या या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या काही भावना असतील त्या त्यांनी पत्रात मांडल्या आहेत आणि केंद्र सरकारला पाठवल्या. त्यावर सरकार काय तो विचार करेल. राहिला प्रश्‍न नाना पटोलेंचा, तर त्यांना हेच कळत नाही की ते सत्तापक्षात आहेत की विरोधी पक्षात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही फार गांभीर्याने लक्षच देत नाही आणि प्रतिक्रिया तर मुळीच देत नाही, असे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या स्थितीवर केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. त्यावर फडणवीस यांना पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पॅन्डॅमिक ही एक आपत्तीच असते. भूकंप आल्यास आपण आपत्ती घोषित करतो आणि एखादा रोग आल्यास पॅन्डॅमिक घोषित करतो. कोरोनासाठी पॅन्डॅमिक घोषित झालेच आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला जर पत्र लिहिलं असेल तर त्यांच्या काही अपेक्षा असतील आणि केंद्र सरकार त्याच्यावर विचार करेल, असे म्हटले होते.

तसेच, लहान घटकांना मदत मिळावी, समाजातील छोट्या घटकांकडेही केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. त्यावर फडणवीस म्हणाले की, नाना पटोलेंही हा सल्ला त्यांच्या सरकारला दिला पाहिजे. नानांना हे समजतच नाही की, ते सत्ता पक्षात आहेत की विरोधी पक्षात. त्यामुळे ते काय बोलतात, हे त्यांनाही नेमकं माहिती नसतं. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर आम्ही सहसा प्रतिक्रियाही देत नसतो. राज्य सरकारने आपली ही काही जबाबदारी आहे, ती केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न करू नये. पण केंद्राची मदत जरूर मागितली पाहिजे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com