क्‍लिपमधील आवाज कोणाचा, हे सर्वांना माहीत; पण ते लपवलं जातंय  - Opposition leader Devendra Fadnavis accuses police in Pooja Chavan's death | Politics Marathi News - Sarkarnama

क्‍लिपमधील आवाज कोणाचा, हे सर्वांना माहीत; पण ते लपवलं जातंय 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

मला वाटतं की पोलिसांवर जो दबाव आहे, तो दूर झाला पाहिजे.

मुंबई : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात पोलिसांनी जेवढ्या गंभीरपणे कारवाई करायला पाहिजे होती, ती होताना दिसत नाही. या प्रकरणातील क्‍लिप ज्या आहेत, त्या फार क्‍लिअर आहेत. त्याच्या आधारावर पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत कारवाई करायला हवी होती. परंतु पोलिस कुठल्या दबावाखाली आहेत का? असा प्रश्‍न निर्माण होतो आहे.

या क्‍लिपमधील आवाज कुणाचा आहे, असा प्रश्‍न वारंवार उपस्थित होतो आहे. तो आवाज कोणाचा आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. पोलिसांनीदेखील ते सांगण्याची गरज आहे. पण, तेही पोलिसांकडून लपवलं जातंय. या प्रकरणात पोलिसांची कारवाई कुठेतरी दबावाखाली आहे, असे यातून स्पष्टपणे दिसतं आहे, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणासंदर्भात तो माध्यमांशी बोलत होते. त्या वेळी फडणवीस यांनी वरील आरोप केला.

पूजा चव्हाण प्रकरणात आरोप होत असलेली व्यक्ती कॅबिनेट मंत्री आहे. त्यांनी राजीनामा द्यायला हवा का? यावर फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात पोलिस जोपर्यंत कारवाई करत नाहीत; तोपर्यंत त्यांना खुलं मैदान आहे.

पोलिसांनी पहिल्यांदा या प्रकरणी कारवाई करत गुन्हा दाखल केला पाहिजे. हे खरं आहे की, अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये राहून चौकशी होऊ शकत नाही. म्हणून मला वाटतं की पोलिसांवर जो दबाव आहे, तो दूर झाला पाहिजे तसेच त्यासंदर्भातील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सत्य लोकांसमोर आलं पाहिजे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरण किती गांभीर्याने घेतले आहे, हे माझ्या लक्षात येत नाही. संदर्भातील त्यांचं कालचं स्टेटमेंटमध्ये मी ऐकलं.

या प्रकरणाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं नाही किंवा त्यांनी त्या क्‍लिप्स नीट ऐकलेल्या नाहीत किंवा त्यांनी त्याची नीट माहिती घेतलेली नाही, असं त्यावरून वाटतं. माझं स्वतःचं असं मत आहे की मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात नीट माहिती घ्यावी. म्हणजे कोणाचं आयुष्य उद्‌ध्वस्त होत आहे आणि कोणाचं नाही, हे त्यांच्या लक्षात येईल, अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना काल दिलेल्या प्रतिक्रियेवरून टोला लगावला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख