लतादीदी, सचिन नव्हे भाजपच्या आयटी सेलची चौकशी... - No enquiry of Lata Mangeshkar and Sachin tendulkar related to farmers protest | Politics Marathi News - Sarkarnama

लतादीदी, सचिन नव्हे भाजपच्या आयटी सेलची चौकशी...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सेलिब्रिटींच्या ट्विटची राज्याचा गुप्तहेर विभाग चौकशी करेल असे म्हटले होते.

नागपूर : शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विट केले होते. या ट्विटनंतर लता मंगेशकर यांच्यासह सचिन तेंडूलकर, कंगना राणावत, रोहित शर्मा, विराट कोहली अशा अनेक सेलिब्रिटींनी एकामागोमाग एक ट्विट करून त्यांना विरोध केला. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या ट्विटची राज्याचा गुप्तहेर विभाग चौकशी करेल असे म्हटले होते. त्यावर देशभरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर देशमुख यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ते विलगीकरणात होते. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी सेलिब्रिटींच्या चौकशीसंदर्भात स्पष्टीकरण दिले.

देशमुख म्हणाले, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. लतादीदी, सचिन तेंडूलकर आमचे दैवत आहेत. त्यांच्या चौकशी आम्ही करणार नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण भाजपच्या आयटीसेलची चौकशी केली जाणार आहे. आयटीसेलचे प्रमुख आणि आणखी काही जणांची नावे समोर आली आहेत. पुढील चौकशी सुरू आहे. या चौकशीतून सत्य परिस्थिती समोर येईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

सेलिब्रिटी ट्विट प्रकरण काय आहे?

कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने राजधानी दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा आणखी कडक केली आहे. या आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे. हॉलिवूडची पॉप स्टार रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलं होतं.

हेही वाचा : अमित शहा नेपाळ व श्रीलंकेतही सत्ता स्थापन करणार...

याला उत्तर म्हणून सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासह अनेकांनी ट्विट केले. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत विरोधी प्रपोगंडा राबविली जात असल्याचा दावा केला होता. त्यावेळी '#IndiaTogether' '#IndiaAgainstPropoganda' असे हॅशटॅग वापरण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच देशातील सेलिब्रिटींनी हे हॅशटॅक वापरून रिहाना व ग्रेटला विरोध करणारे ट्विट केले. 

सेलिब्रिटींच्या या ट्विटवर अनेकांनी टीकाही केली. काँग्रेसने याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना संबंधित ट्विटची चौकशी करण्याची मागणी केली होती. सर्व सेलिब्रिटींचे ट्विट एकसारखेच असल्याने केंद्र सरकारनेच त्यांच्यावर दबाव आणला होता, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. त्यामुळे भाजप या ट्विटच्या अनुषंगाने भाजप नेत्यांची चौकशी करावी, असे सावंत यांनी म्हटले आहे. 

याबाबत सावंत यांनी ट्विटरवरूनच ही माहिती दिली आहे. गृहमंत्री देशमुख यांच्यासोबत झालेल्या झूम कॉलमध्ये देशमुख यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचे म्हटले आहे. गृहमंत्र्यांच्या या आदेशामुळे वाद निर्माण झाला होता.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख