मोदीजी...आता तरी झोपेतून जागे व्हावे आणि जनतेचे जीव वाचवा 

देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे.
Modiji ... wake up now and save the lives of the people : nana patole
Modiji ... wake up now and save the lives of the people : nana patole

मुंबई  ः कोरोना महामारीच्या संकटाची चाहूल लागताच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धोक्याची जाणीव करून दिली होती. महामारीच्या या वर्षभरात सातत्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सकारात्मक सूचना केल्या परंतु सत्तेच्या अहंकाराने आपल्याच मस्तीत दंग असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते राहुल गांधींना गांभीर्याने घेत नाही, असे म्हणत त्यांची खिल्ली उडवण्याचा पोरकटपणा करत राहिले. राहुल गांधींनी वेळोवेळी केलेल्या विधायक सूचनांना मोदी सरकारने गांभीर्याने घेतले असते, तर आज देशात हजारो चिता जळतानाचे विदारक चित्र पाहण्याची वेळ आपल्यावर आली नसती. आतातरी मोदी सरकारने झोपेतून जागे व्हावे आणि १३० कोटी जनतेच्या जीविताकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

या संदर्भात पटोले म्हणाले की, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाच्या रूग्णसंख्येत दररोज दोन लाखांपेक्षा जास्त रूग्णांची भर पडत आहे, तर हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. रुग्णालयात बेड्स मिळत नाहीत, रेमडेसिव्हिर व ऑक्सीजनअभावी रुग्णांचे जीव जात आहेत आणि अंत्यसंस्कारासाठीसुद्धा रांगा लावाव्या लागत आहेत, असे विदारक चित्र देश उघड्या डोळ्यांनी पहात आहे. परंतु केंद्रातील भाजप सरकारला याचे काही सोयरसुतक नाही. देश कोरोनाच्या आगीत होरपळत असताना देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे. हा बेफिकीरपणाच आज देशातील जनतेच्या मुळावर उठला आहे.

एक वर्षानंतरही तीच परिस्थिती कायम 

कोरोनाचा प्रार्दुभाव सुरु झाल्यापासून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारला आर्थिक पातळीवर होऊ शकणारे नुकसान तसेच वैद्यकीय क्षेत्रात करावयाच्या उपाय योजनांवर सूचना करत होते. त्या वेळी देशाचे पंतप्रधान मात्र जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवायला आणि दिवे लावायला सांगत होते. राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी २०२० रोजी केंद्र सरकारला गंभीर परिणामाचा इशारा दिला होता. आज एक वर्षानंतरही तीच परिस्थिती कायम आहे. नोटाबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली जीएसटीची अंमलबजावणी, कोणतीही पूर्वसूचना न देता व नियोजन न करता अचानक लावलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ऐतिहासिक रसातळाला गेली. लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरिबांच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याची सूचना राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली होती. पण, नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले गेले, त्याची फळं देशातील गरीब जनता भोगते आहे.

त्यावेळी राहुल गांधींवर लॉबिंगचा पोरकट आरोप केला 

कोरोनाला रोखण्यासाठी सध्यातरी लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळे जगभरात उपलब्ध असणाऱ्या लसींना परवानगी देऊन देशातील लसीकरणाचा वेग वाढवावा, अशी सूचना राहुल गांधींनी केली होती. त्यावेळी राहुल गांधी औषध कंपन्यांसाठी लॉबिंग करत असल्याचा पोरकट आरोप केला. त्यानंतर चार दिवसांतच केंद्र सरकारने परदेशी लसींना परवानगी दिली. कोरोना लसीकरणासाठी वयाची अट शिथील करून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची मागणी आम्ही केली आहे. सरकारने त्यावर गांभीर्यांने विचार करून तातडीने निर्णय घेतला नाही, तर परिस्थिती आणखी गंभीर होईल.

तज्ज्ञांच्या सूचनांकडे डोळेझाक

कोरोना महामारीच्या वर्षभराच्या काळात विरोधी पक्षांसह अनेक तज्ज्ञांनी केलेल्या सूचनांकडे मोदी सरकारने डोळेझाक करून आपले राजकीय अज्ञान उघड केले आहे. राज्यातील भाजप नेतेही कोणालाच गांभीर्याने घेत नाहीत, अशी विधाने करून या महामारीच्या काळात हीन राजकारण करत आहेत. केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी सतत विरोधी पक्षांच्या सरकारवर टीका करणे, हा एककलमी कार्यक्रम भाजप नेत्यांनी हाती घेतला आहे. संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन मुकाबला करणे अपेक्षित असताना आपले राजकीय दुकान चालू राहावे, यासाठी त्यांची धडपड सुरु असून भाजपचा विकृत चेहरा आता जनतेसमोर आला असून जनताच आता त्यांना गांभीर्याने घेणार नाही.

मोदींना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची हौस

देशभरात कोरोना वेगाने वाढत असताना त्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अख्खा भारतीय जनता पक्ष फक्त पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात दंग आहे. लोक वैद्यकीय उपचारांअभावी प्राण सोडत असताना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची मोदींची हौस अजून संपलेली दिसत नाही. गरीब, असहाय्य जनतेच्या मृतदेहावर उभे राहून निवडणुकीचा प्रचार करणारा पंतप्रधान म्हणून देशाच्या इतिहासात नरेंद्र मोदींची नोंद होईल, असे नाना पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com