पुणे : कोरोनाच्या काळात पायाला भिंगरी बांधून अख्ख्या राज्यात फिरून कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य वाढविणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर टप्प्यात कोरोनाची लागण झाली. याबाबतची माहिती स्वतः देशमुख यांनी शुक्रवारी (ता. 5 फेब्रुवारी) ट्विट करून दिली.
दरम्यान, कोरोनावर मात करून मी पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल, असा विश्वासही देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
ट्विटमध्ये देशमुख यांनी म्हटले आहे, "माझी कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मी करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.''
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 5, 2021
राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असताना पोलिस हे जनतेच्या संरक्षणासाठी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उभे राहून खडा पहारा देत होते. त्या पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी, त्यांना शाबासकी देण्यासाठी देशमुख यांनी संपूर्ण राज्याचा दौरा केला होता. कोरोनाचा ज्वर मोठ्या प्रमाणात असतानाही जे काही मोजके राजकारणी राज्यभर फिरून जनतेला दिलासा देण्याचे काम करत होते. त्यात गृहमंत्री देशमुख यांचा समावेश होता. त्याही परिस्थितीत लॉकडाउनच्या काळात जनतेमध्ये जागृती करण्यासाठी नागपूरसह सर्वत्र फिरत होते. त्याकाळातही दक्षता घेऊन त्यांनी कोरोनाला दूर ठेवले होते. मात्र, कोरोनाचा ज्वर ओसरत असतानाच त्यांना या विषाणूने गाठले आणि आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
विदर्भात सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू आहे, पक्षाची ही यात्रा यशस्वी करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न चालवले होते. त्यांना गुरुवारी थकवा जाणवल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. त्या चाचणीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून संपर्कातील व्यक्तींनी कोरोनाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

