भंडारा अग्नितांडवावर देवेंद्र फडणवीस म्हणाले… - Devendra Fadnavis said on Bhandara Agnitandava | Politics Marathi News - Sarkarnama

भंडारा अग्नितांडवावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 जानेवारी 2021

भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला.

मंबुई : मध्यरात्री सारेच झोपेत असताना दहा नवजात बालकांवर काळाने घाला घातला. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला.

मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. “भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी!”, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.

 

भंडारामधील घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक, प्रगतीशील महाराष्ट्रात 10 नवजात बालकांचा मृत्यू ICU मध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कडक कारवाई करावी. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारी दवाखान्यांचे ऑडिट व्हायला पाहिजे, महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना आहे.

फायर ऑडिट का झालं नाही याची चौकशी व्हावी. यावर राजकारण करायचं नाही, मात्र ज्यापद्धतीने दावे केले जात आहे त्यात अर्थ नसून ते चुकीचे आहेत. मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. देवेंद्र फडणवीस नागपुरातून भंडाऱ्याकडे निघाले आहेत. तिथे ते घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत.

भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. घटनेची माहिती मिळताच अग्रिशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यासह देशभारत हळहळ व्यक्त होत आहे. 

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश 

भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. माहिती घेण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख