नागपूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यात नुकत्यात झालेल्या भेटीवर तर्कवितर्क लढविले जात आहेत. पण स्वत: मुनगंटीवार यांनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले. तर 30 कोटी झाडे लावणारे मुनगंटीवर मला भेटले पण त्यांच्या झाडांना (राजकीय) फळे येणार नाहीत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनीही राजकीय चर्चेवर पडदा टाकला.
सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. भाजपमधून अनेक आमदारांचे आऊटगोईंग होणार असल्याचा दावा इतर पक्षांतील नेत्यांकडून केला जात आहे. यापार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांशी झालेली भेट महत्वाची मानली जात होती.
पण राजकीय चर्चांना पुर्णविराम देताना मुनगंटीवार म्हणाले, ‘माझ्या जिल्ह्यातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो. चंद्रपूर विमानतळ, कृषी क्षेत्र, विजेच्या संदर्भात चर्चा झाली. या भेटीत राजकीय चर्चा झाली असती तरी ती नागरिकांच्या हिताची असती. असे असेल तर मग भेटण्यात अडचण काय आहे?’ असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या भेटीवरून सुरू झालेल्या राजकीय चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनीही बुधवारी एका कार्यक्रमात या भेटीवर भाष्य केले. ते म्हणाले, 30 कोटी झाडे लावणारे मुनगंटीवार मला भेटले. पण त्यांच्या झाडांना (राजकीय) फळे लागणार नाहीत. त्यांनी या झाडांच्या मुळावर घाव घालू नयेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ही भेट राजकीय नसल्याचे सांगितले. 'महाराष्ट्रात कोणी कोणाला भेटायचे नाही का? दोन नेते एकमेकांना भेटले की ती मोठी बातमी होते. मुनगंटीवार हे त्यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांसंदर्भात भेटले आहेत. ही भेट राजकीय नव्हती,' असे पाटील यांनी स्पष्ट केले.
Edited By Rajanand More

