फडणवीस विरोधी पक्षनेते राहणार नाहीत कारण... मुनगंटीवारांचे जयंत पाटलांना प्रत्यूत्तर

जयंत पाटील यांनी एका सभेमध्ये बोलताना देवेंद्रफडणवीसांना लक्ष्य केले होते.
BJP Leader Sudhir Mungantiwar slams NCP Leader Jayant Patil
BJP Leader Sudhir Mungantiwar slams NCP Leader Jayant Patil

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर बोचरी टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना फडणवीस यांचे विरोधी पक्षनेतेपद पाच वर्षे राहील का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. 

पंढरपूर मतदारसंघात जयंत पाटील यांनी तळ ठोकला आहे. राष्ट्रवादीसह भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे राज्यातील बड्या नेत्यांच्या सभा होऊ लागल्या आहेत. पाटील यांनी एका सभेमध्ये बोलताना फडणवीसांना लक्ष्य केले होते. ते म्हणाले होते की, भाजपकडे आता कार्यकर्ते उरले नाही. अनेक जण महाविकास आघाडीत येत आहेत. हे चित्र पाहिले तर फडणवीस यांचे विरोधी पक्षनेतेपद तरी पाच वर्षे टिकेल का, असा प्रश्न उपस्थित करून पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला.

पाटील यांना प्रत्युत्तर देत मुनगंटीवार यांनी पुन्हा सत्तांतराची आठवण करून दिली. ते म्हणाले, जयंतराव पाटील पंढरपूरच्या पवित्र वातावरणाच्या सभेत म्हणाले, देवेंद्र फडणवीस जास्त वर्ष विरोधी पक्षनेते राहणार नाहीत. याचा अर्थ मी समजो तो म्हणजे ते विरोधी पक्ष न राहता सत्तेतच येणार आहेत. जयंत पाटील हे दुरदृष्टीचे नेते आहेत. त्यांच्या टप्प्यात आला की ते बरोबर योग्य निर्णय सांगतात, असे म्हणत मनुगंटीवार यांनी पाटील यांनाही टोला लगावला. 

तुम्ही रहा पाच वर्षे पण...

दरम्यान, राज्याची आर्थिक स्थिती, कोरोना परिस्थिती आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, आम्हाला सध्याच्या स्थितीत राजकारण करायचे नाही. शेवटी हे आमचे-तुमचे सरकार हा विषयच नाही. तुम्ही रहा ना पाच वर्ष. पण तुम्ही टिकताना जनता टिकली पाहिजे. गरिबांच्या कल्याणासाठी योजना करताना तो व्यर्थ जात नाही. तो पैसा पुन्हा बाजारात येतो. बाजारात वस्तूंची विक्री वाढते. पॅकेजासाठी 32 हजार कोटी हवे होते. 

महाराष्ट्रसह देशातील राज्य व जगाचीच आर्थिक स्थिती तणावाची आहे. कामकाज बंद होते. कोरोनाचे संकट आहे. या संकटात जीडीपी अपेक्षित वाढवू शकला नाही. महाराष्ट्रात व्यापार, उद्योगांचा नकारात्मक विकास दर आहे. अशाही संकटात राज्य सरकारला जनतेला वाऱ्यावर सोडता येत नाही. डिसेंबरमध्ये नगर विकास विभागाला 888 कोटी रुपये दिले. आमदारांना दोन हजार कोटी दिले. कर्मचाऱ्यांना 12 हजार कोटी महिन्याला पगार देतो. मंत्र्यांचे बंगल्यांवर खर्च सुरू आहे. आर्थिक तणावात आपण या बाबींवर खर्च करतो तेव्हा गरिबांसाठी खर्च करणे आपली जबाबदारी आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

राज्यात 43 प्रकारचे वर्ग आहेत. त्यांना मदत करता येऊ शकते. त्यासाठी फारसा खर्च येणार नाही. जीएसडीपीच्या किमान एक टक्का खर्च करायला हवे. आमदार निधी वाढवता, पण याक्षणी एक लक्ष कोटी डिपॅाझिट आहे. राज्य आज 37 हजार कोटीचे व्याज भरत आहे. सरकारला विनंती आहे. अशा प्रसंगात सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करूया, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com